एकाच रूग्णाचे दोन रक्तगट !; उपमहापौरांचा आक्रमक पवित्रा ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । कोविडच्या रूग्णांची संख्या वाढत असतांना याच्या उपचारातील निष्काळजीपणाचे प्रकार देखील वाढीस लागले आहे. असाच एक प्रकार आज उघडकीस आला असून यात एका रूग्णाला प्लाझ्माची आवश्यकता असतांना सिव्हील हॉस्पीटल आणि रेडक्रॉस सोसायटी या दोन्हींमध्ये त्या रूग्णांचे वेगवेगळे ब्लड ग्रुप आल्याने गोंधळ उडाला. उपमहापौर कुलभूषण पाटील यांना हा प्रकार माहित पडताच त्यांनी थेट सिव्हीलमध्ये धाव घेऊन संबंधीतांना धारेवर धरले. अखेर या प्रकरणी चौकशीचे आश्‍वासन देण्यात आले. मात्र यामुळे उपचारातील निष्काळजीपणा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमके काय झाले ?

एका महिला रूग्णावर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या महिलेवरील ट्रिटमेंटसाठी प्लाझ्माची आवश्यकता असल्याचे तेथील डॉक्टर्सनी सुचविले. यासाठी रक्तगटाची विचारणा केली असता महिलेच्या आप्तांना याची माहिती नव्हती. यामुळे जिल्हा रूग्णालयात चाचणी करून संबंधीत महिलेला एबी पॉझिटीव्ह या रक्तगटाचा प्लाझ्मा हवा असे सांगण्यात आले. यानुसार त्या महिलेचा मुलगा रेडक्रॉस सोसायटीमध्ये गेला. तेथे गेल्यानंतर रेडक्रॉस सोसायटीच्या तंत्रज्ञांनी या महिलेचा रक्तगट हा बी पॉझिटीव्ह असा असल्याने त्यांना याच रक्तगटाचा प्लाझ्मा लागेल असे सांगितले. यामुळे प्लाझ्मा एबी पॉझिटीव्हचा घ्यावा की बी पॉझिटीव्हचा असा त्यांच्या मनात गोंधळ उडाला.

उपमहापौर कुलभूषण पाटील यांची धाव

दरम्यान, संबंधीत रूग्णाच्या मुलाने ही सर्व बाब उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या कानावर टाकली. ही माहिती मिळताच उपमहापौरांनी थेट सिव्हील रूग्णालय गाठले. येथे त्यांनी उपस्थित डॉक्टर्सला धारेवर धरले. कोरोनाच्या उपचारामध्ये प्लाझ्मा थेरपी ही महत्वाची असली तरी संबंधीत रूग्णाचा रक्तगट असेल त्याच रक्तगटाचा प्लाझ्मा आवश्यक असतो. मात्र चुकीने दुसर्‍या रक्तगटाचा प्लाझ्मा दिला गेला तर रूग्णाला इन्फेक्शन होऊन तो दगावू देखील शकतो. सिव्हीलमधील कर्मचार्‍यांच्या भोंगळ कारभारामुळे महिला रूग्णाच्या प्राणावर बेतले असते असे सांगत उपमहापौर पाटील यांनी रूद्रावतार धारण केला. यानंतर तरी असा प्रकार घडता कामा नये अशी तंबी कुलभूषण पाटील यांनी याप्रसंगी दिली. तसेच, त्यांनी लॅब टेक्नीशियनने केलेली नोंद पाहिले असता तेथे देखील एबी पॉझिटीव्ह अशीच नोंद करण्यात आल्याचे दिसून आले.

कारवाईचे आश्‍वासन

कुलभूषण पाटील यांनी याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मारूती पोटे यांच्याशी चर्चा केली. डॉ. पोटे यांनी देखील हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचे मान्य केले. या प्रकरणात तंत्रज्ञाची चूक असून याबाबत चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही डॉ. पोटे यांनी दिली. यावर कुलभूषण पाटील यांनी नेमकी कारवाई कधीपर्यंत होणार ? अशी विचारणा केली असता उद्या दुपारपर्यंत कारवाई करण्यात येईल अशी माहिती डॉ. पोटे यांनी दिली.

खाली पहा या घटनेचा व्हिडीओ.

Protected Content