Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पूर्ण विचारांती लॉकडाऊनचा निर्णय घेणार- जिल्हाधिकार्‍यांची घोषणा ( Video)

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता आकडेवारीचे अध्ययन करून पूर्ण विचारांती लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल. मात्र यासाठी नागरिकांना पुरेसा वेळ दिला जाईल असे स्पष्ट प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

सध्या कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणावर वाढला असतांना आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी महत्वाची पत्रकार परिषद बोलावली. यात ते नेमके काय बोलणार याबाबत उत्सुकता लागली होती. यात जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात पुरेसे बेड उपलब्ध आहेत. रेमडीसीवर औषधांचा कोणताही प्रकारचा तुटवडा नाही. कुण्या हॉस्पीटलमधून अमुक-तमुक ठिकाणाहून खरेदी करण्याची सक्ती केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, आधीप्रमाणेच खासगी रूग्णालयांचे ऑडिट करण्यात येणार आहे. यासाठी आधींचेच नियम कायम राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. संशयित रूग्णांवरील उपचारासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार असून याच्या मदतीने उपचारांमध्ये सुसुत्रता येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, रूग्णांचे निदान वेळेत होणे आवश्यक आहे. यासाठी कोणतीही लक्षणे आढळून आल्यास तातडीने चाचण्या करणे गरजेचे आहे. यासाठी संशयित रूग्ण शोध मोहिम सुरू करण्यात आलेली आहे. ही मोहिम जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. जी शहरे आणि तालुके कोरोनाने जास्त बाधीत आहेत तेथून पहिल्यांदा ही चाचणी मोहिम राबवण्यात येणार आहे. कंटेनमेंट झोनवर लक्ष केंद्रीत करून रूग्णसंख्यात तपासण्यात येत आहे. यात विशेष करून वर्क प्लेसमधील संबंधीत रूग्णांच्या सहकार्‍यांच्या चाचण्यांना प्राधान्य दिले जात असल्याची माहिती देखील जिल्हाधिकार्‍यांनी दिली. तर पत्रकारांसाठी स्वतंत्र कोविड केअर प्रणाली उभी करण्याचे काम देखील सुरू असल्याचे ते म्हणाले. जळगाव जिल्ह्यात सध्या तरी लॉकडाऊन लागणार नसले तरी परिस्थीती लक्षात घेऊन आणि पुरेसा वेळ देऊन याचा निर्णय घेण्यात येईल असे सूतोवाच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले की, जिल्ह्यात पोलीस दलातर्फे मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाया सुरू आहेत. यात मास्क नसलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिली. नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. पोलीस कर्मचारी आणि कुटुंबियांवर उपचारांसाठी पोलीस कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून येथे ४० रूग्णांची सुविधा करण्यात आलेली असल्याची माहिती डॉ. मुंढे यांनी दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील म्हणाले की, ग्रामीण भागात रूग्णसंख्या वाढीस लागली असल्याची बाब स्पष्ट आहे. मात्र याच्या प्रतिकारासाठी ग्रामस्थांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात रूग्ण शोध मोहिम सुरू करण्यात आली असून यात ग्रामीण भागातील रूग्णांची तपासणी देखील करण्यात येत असून या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.

तर आयुक्त सतीश कुलकर्णी म्हणाले की, जळगाव शहरातील संशयित रूग्णांची तपासणी करून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्याला आमचे प्राधान्य आहे. शहरातील हॉटस्पॉटमध्ये मास टेस्ट चाचणी करण्यात येणार आहे. पिंप्राळा, अयोध्यानगर, गणेश कॉलनी, कांचन नगर आदी भागांमध्ये कांचन नगर आदी भागांमध्ये तपासणीची सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Exit mobile version