Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरारी फाऊंडेशनच्या कोविड केअर सेंटरमधून ६१ रूग्णांना निरोप

जळगाव प्रतिनिधी । येथील भरारी फाऊंडेशनतर्फे संचलीत करण्यात येणार्‍या कोविड केअर सेंटरमधून आजवर ६१ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

भरारी फाऊंडेशन या बहुउद्देशीय संस्थेने छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुल येथे ५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी दर्जेदार रूग्णसेवा उपलब्ध करण्यात आली आहे. भरारी फाउंडेशनच्या तज्ञ डॉक्टर्स, सेवाभावी स्वयंसेवक यांच्या सच्छिल सेवेमुळे एकूण आजपर्यंत ६१ रुग्ण यशस्वी उपचार घेऊन पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत.

त्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारून फुलांच्या वर्षावात त्यांना निरोप देण्यात आल्याची माहिती आज संस्थेतर्फे देण्यात आली. बरे झालेल्या रूग्णांना निरोप देतांना डॉ. केतन पाटील, डॉ.स्वप्नील पाटील व नर्सेससह भरारी फाउंडेशनचे सचिन महाजन, दीपक परदेशी, मोहित पाटील, देवराज बोरसे तेजस पाठक बाळू परदेशी उपस्थित होते.

दरम्यान, आरोग्यसोबतच त्यांच्या मनालाही उभारी मिळावी यासाठी अनेक मोटिवेशनल स्पीकर्स तसेच मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर या सेंटरला भेट देऊन जात असतात. यात नाट्य समीक्षक व सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, आणि मोटिवेशनल स्पीकर रामचंद्र पाटील, जयदीप पाटील, गिरीश कुलकर्णी यांनी भेट देऊन रुग्णांचे स्वतंत्र सेशन घेतले आहे. तर, निसर्गोपचार तज्ञ अनंत महाजन हे रोज सकाळी ८ ते ८:३० या कालावधीत रुग्णांचा अर्धा तास योग वर्ग घेऊन त्यांची प्रतिकारक्षमता वाढवीत आहेत.

कोविड केअर सेंटरमधील रूग्णसेवेसाठी भरारी फाउंडेशनचे पालक रजनिकांत कोठारी, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, जैन उदयोग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, अनिष शहा, नंदू आडवाणी, अनिल भोकरे, डॉ.राजेश पाटील, सपन झुनझुनवाला, सुशील नवाल, सुनील झंवर, आदेश ललवाणी, अनिल कांकरिया, सभापती सुचिता हाडा,रवींद्र लढा, नरेश खंडेलवाल, अमर कुकरेजा, डॉ.राधेश्याम चौधरी व अजिंक्य देसाई यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तर भरारी फाउंडेशनचे कार्यकर्ते यासाठी परिश्रम घेत आहेत.

Exit mobile version