पुस्तक भिशी व ‘देवकाई प्रतिष्ठान’तर्फे आदर्श मातांचा हृद्य सत्कार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सत्यशोधक समाज संघ जळगाव,भारतरत्न डॉ.ऐ.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी व देवकाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने आदर्श मातांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

सत्यशोधक समाज संघ जळगाव,भारतरत्न डॉ.ऐ.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी व देवकाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने आदर्श मातांचा शाल श्रीफळ,बुके तसेच ’ श्यामची आई ’ ग्रंथभेट देऊन कौटुंबिक वातावरणात हृद्य सत्कार करण्यात आला.

जन्माच्या वेळी नाळ तोडल्यावर मूल वेगळे होते मात्र आईचे नाते मुलाशी एका अनामिक,अदृश्य व अतूट नाळेने आमरण जोडलेले असते !आई अंतिम श्वासापर्यंत निवृत्त होत नसते ! कुटुंब पद्धतीमुळे पुढील पिढीच्या नव तरुणांना आईने एकत्र कुटुंब पद्धतीत केलेला निःस्सीम त्याग, समर्पण, प्रतिक्षण सजगता, समायोजन, निरपेक्ष योगदान,विवेक,अभिजात संयम या मातृत्वाच्या विविध अतुलनीय गुणांचे कृतीशील प्रेरक गुणदर्शन दुर्मिळ झाले आहे ! भावंडांचे अन्यायी वाटेहिश्श्यातून निर्माण झालेले वैमनस्य,भाऊबंदकीचे मानपानाचे नाटय,अनाठायी निंदानालस्ती यातून विकोपाला गेलेल्या संबधातून सद्गुणी समर्पित मातांची पदोपदी अवहेलना होते. परिणामी सामाजिक प्रतिमा मालिन होते.ज्या मातांनी हिरे माणकांना जन्म दिला आणि त्या लेकरांनी मातेच्या अनुभवाधिष्ठीत ज्ञान व संस्काराच्या शिदोरीवर आपल्या कर्तृत्वाने विविध क्षेत्रात लक्षणीय प्रेरणादायी कार्य केले.आपल्या अतुलनीय उत्तुंग यशामुळे मातापित्यांचा नावलौकिक वाढविला. अशा गुणीजनांच्या प्रसिद्धीपासून दूर राहणार्‍या व पडद्यामागील दिपस्तंसमान आदर्श मातांचा सत्कार करून सामाजिक व नैतिक उत्तरदायित्व कृतज्ञतेने पार पाडावे हे आदर्श मातांच्या सत्कारांचे उद्दिष्ट होते.

आदर्श मातांच्या सत्काराची प्रेरणा व आर्थिक सहकार्य सुप्रसिद्ध बाल साहित्यिका मायाताई दिलीप धुप्पड यांनी दिली. जळगावच्या महापौर जयश्रीताई महाजन यांच्या मातोश्री सौ.उषाताई सुकदेव नारखेडे यांचा भावपूर्ण सत्कार सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा समन्वयक तथा भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक प्रमुख विजय लुल्हे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी जयश्री ताईंचे पिताश्री तथा निवृत्त मुख्याध्यापक सुखदेव नारखेडे,बंधु तुषार नारखेडे,आश्विनी नारखेडे,रोहिणी नारखेडे कुटूंबिय उपस्थित होते. मातोश्री उषा नारखेडे यांनी राजकारणातून दीनदलीतांची सेवा करणे आणि विधवा,परित्यक्ता,लैंगिक अत्याचार पिडीत माता भगिनींना न्याय मिळवून देणे,सर्वसामान्य नागरीकांना शासकीय सेवेचा लाभ मिळवून देणे.निष्कलंक व तत्वनिष्ठेने राजकिय चरित्र्य जपणे या संस्काराची दीक्षा महापौर जयश्री दिदीला दिली.पुस्तक भिशीने या संस्कारांची व योगदानाची दखल घेतल्याबद्दल तुषार नारखेडे यांनी भिशीच्या अनौपचारिक घरगुती सत्काराच्या अभिनव उपक्रमाबद्दल कृतज्ञतापूर्वक प्रशंसा केली.

निवृत्त संस्कृत शिक्षिका श्रीमती शोभा राणे ऐ.टी.झांबरे विद्यालय,जळगाव यांचा सत्कार विजय लुल्हे यांनी केला.न्याय,समता,बंधुता संविधानिक मूल्य व जातिय निर्मूलन कृतीशील मूल्यांचा वारसा कलावंत सुपूत्री अर्चना शेलार यांना दिल्याची दखल घेण्यात आली.राणे यांच्या सत्काराप्रसंगी सुप्रसिद्ध शिल्पकार, पत्रकार व कवी निरंजन शेलार व चित्रकार सुकन्या अर्चना शेलार उपस्थित होते.

जळगाव मुलींचे बालगृह जळगाव अधिक्षिका श्रीमती जयश्री पाटील यांचा हृद्य सत्कार सुकन्या नम्रता नेहेते यांच्या हस्ते करण्यात आला. चुकीच्या पोलिओ डोसमुळे कर्णबधिर झालेल्या एक वर्षाच्या नम्रतेच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होऊ नये ; तिला सर्वसामान्य मुलांसारखे आनंदी जीवन जगायला मिळावे. संगोपनासाठी लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने दुसरे अपत्य होऊ दिले नाही. सुकन्या नम्रतेला अपंगांच्या शाळेत न टाकता थ्री – व्हीआरएसएच स्पीच थेरपी दिली.शैक्षणिक गुणवत्तेने मार्गदर्शन करता यावे यासाठी जयश्री ताईंनी श्रवणदोष असलेल्या मुलांसाठीचे स्पेशल बी.एड.चे शिक्षण घेतले.एवढेच नव्हे तर वंचित व पिडीत बालकांना अध्यापन करता यावे, लोकमाता होऊन समाजसेवा करता यावी म्हणून त्यांनी एम.एस.डब्ल्यू पदविका शिक्षण घेतले.जयश्री मॅडम आता आठ वर्षापासून अधीक्षिका म्हणून बालगृहात जळगाव येथे कार्यरत आहेत.नम्रताने डिस्टिंक्शन मिळवत बी.सी.ए.व बी.टेक शिक्षण घेऊन आईच्या त्याग व समर्पणाचे चीज केले! आता नम्रता एम.पी.एस.सी.ची तयारी करीत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रस्त्यावरील फुल विक्रेत्या श्रीमती मंगला वसंत सपकाळे यांचा सुपुत्र समाधान सपकाळे यांच्या हस्ते मंगलाताईंचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला याप्रसंगी देवकाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष चित्रकार सुनील दाभाडे, विजय लुल्हे, सत्कारार्थींचे चिरंजीव मनोज सपकाळे,फुलविक्रेत्या सीमा सोनवणे,अमोल सोनवणे उपस्थित होते.मातोश्री श्रीमती सिंधु सुतार यांचा सत्कार चिरंजीव विजय लुल्हे यांनी करून शुभाशिर्वाद घेत मातृदिनाच्या कार्यक्रमाचा समारोप केला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मार्गदर्शन निवृत्त जिल्हा शिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड,निवृत्त प्राथमिक शिक्षण उपसंचालक तथा सुप्रसिद्ध कवी शशिकांत हिंगोणेकर व निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांनी दिली.

Protected Content