Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपच्या महाआक्रोश मोर्चातून राज्य सरकारचा निषेध (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा आज महाआक्रोश मोर्चा पार पडला. यात राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्याचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. या माध्यमातून आज भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून आले.

शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाईची मदत मिळावी, कृषी पंपांची वीज जोडणी तोडू नये आदी मागण्यांसाठी आज भाजपने महाआक्रोश मोर्चा काढला. शिवतीर्थ मैदानापासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. प्रारंभी भाजपच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मोर्चा सुरू झाला. स्वत: माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी एका ट्रॅक्टरचे सारथ्य केले. यावर पक्षाचे तमाम नेते आणि महत्वाचे पदाधिकारी स्वार झाले होते. यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंदूलाल पटेल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, नंदू महाजन, पी.सी. पाटील, राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर आदींसह अन्य पदाधिकार्‍यांचा समावेश होता.

मोर्चेकर्‍यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. दरम्यान, स्वातंत्र्य चौकातून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाला. येथे पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. यात खासदार उन्मेष पाटील यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. आमदार गिरीश महाजन यांनी देखील पालकमंत्र्यांना टोले लगावत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

दरम्यान, यानंतर पक्षाच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यात प्रामुख्याने आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळावी, शेतकर्‍यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळावी आदी मागण्यांचा समावेश होता.

खालील व्हिडीओजमध्ये पहा भाजपच्या महाआक्रोश मोर्चाची क्षणचित्रे….

Exit mobile version