Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेरचे ‘चाणक्य’ जितेंद्र पाटील गोत्यात : चौकशी सोबत घराची झाडाझडती !

जामनेर, प्रतिनिधी । माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांचे ‘राईट हँड’ आणि स्थानिक राजकारणातील प्रमुख सूत्रधार समजले जाणारे जितेंद्र पाटील यांना बीएचआर घोटाळ्यात अटक केल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे या अटकेचे स्थानीक पातळीवर पडसाद उमटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आ. गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय अडकले असल्याचे आरोप अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी आधीच जाहीरपणे केले होते. विशेष करून काही मालमत्ता या अत्यंत कवडीमोल भावात विकत घेण्यात आल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. या अनुषंगाने आज पहाटे या प्रकरणी झालेल्या सात जणांच्या अटकेत आ. गिरीश महाजन यांचे जितेंद्र पाटील आणि छगन झालटे हे दोन अतिशय जवळचे सहकारी पोलीसी कारवाईच्या जाळ्यात अडकले आहेत.

जितेंद्र पाटील हे जामनेरच्या राजकारणातील अतिशय मोठे नाव आहे. आ. गिरीश महाजन यांचे ते अतिशय विश्‍वासू सहकारी आहेत. गिरीशभाऊ मंत्री बनल्यानंतर तर ते स्थानिक बाबतीत सर्वस्वी जितेंद्र पाटील यांच्यावर विसंबून असल्याचे अनेकदा अधोरेखीत झाले आहे. तर आ. महाजन यांच्या मंत्रीपदाचा लाभ देखील त्यांनाच सर्वाधीक झाल्याची अनेकदा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तक्रार देखील केली आहे. कधी फारसे जगासमोर न येता, अर्थात लो-प्रोफाईल राहून जितेंद्र पाटील यांनी आ. गिरीश महाजन यांची स्थानिक राजकीय सूत्रे हे अतिशय समर्थपणे सांभाळली आहेत. यामुळे त्यांना अनेकदा जामनेरचे राजकीय चाणक्य म्हणून देखील ओळखले जाते. त्यांच्या सौभाग्यवती या जामनेर पालिकेतील नगरसेवीका आहेत. ते स्वत: शैक्षणिक संस्थेच सचिव आहेत. मात्र सहसा पडद्यावर न दिसून येणारे जितेंद्र पाटील हे बीएचआर प्रकरणी गोत्यात आल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

Exit mobile version