Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सर्वपक्षीय ‘पोहच’ असतांनाही भागवतशेठ गोत्यात; मदतीसाठी एकवटले भंगाळे व भोळे कुटुंब

जळगाव प्रतिनिधी । प्रत्येक राजकीय पक्षात वरिष्ठ पातळीपर्यंत ‘पोहच’ असणार्‍या भंगाळे कुटुंबातील भागवतशेठ भंगाळे यांना बीएचआर प्रकरणात अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांना मदत करावी म्हणून भंगाळे व भोळे कुटुंबातील सदस्य जिल्हापेठ पोलीस स्थानकाबाहेर ठाण मांडून बसल्याचे दिसून आले आहे.

भागवतशेठ भंगाळे हे जळगावातील ख्यातनाम व्यावसायिक आहेत. कुणाच्या अध्यात-मध्यात नसणारे व्यवहारकुशल व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. ते स्वत: राजकारणात नसले तरी त्यांचे संपूर्ण कुटुंब राजकारणातील विविध पदांवर आहेत. त्यांचे शालक राजूमामा भोळे हे जळगावचे आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. पुतणे विष्णू भंगाळे हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असून बंधू डॉ. अर्जुन भंगाळे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. तर एक पुतणे सुनील भंगाळे हे जिल्हा मेडीसीन डिलर्स असोसिएशनचे दोन दशकांपासून सर्वेसर्वा आहेत.

आमदार राजूमामा भोळे यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीत भागवत भंगाळे यांचा पडद्याआड मोलाचा वाटा असल्याची बाब तशी सर्वांनाच माहित आहे. तर भंगाळे कुटुंबाची एकजुट सुध्दा अनेकदा कौतुकाचा विषय बनलेली आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज पहाटे त्यांना बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात ताब्यात घेतल्याने साहजकीकच खळबळ उडाली आहे. भागवतशेठ भंगाळे यांच्या अटकेची माहिती मिळताच आमदार राजूमामा भोळे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, सुनील भंगाळे आदींसह कुटुंबातील सदस्यांनी जिल्हापेठ पोलीस स्थानकात धाव घेतली. आमदार भोळे यांनी काही वेळ पोलीस स्थानकात चर्चा केल्यानंतर ते स्थानकाच्या गेटबाहेर उभे आहेत. तर आत भागवतशेठ यांची चौकशी सुरू आहे.

Exit mobile version