Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात मध्यरात्री एटीएम फोडण्याचा प्रयत्न; तरूणास अटक

atm 7

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील खेडी येथील तरूणाने डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी शहरातील नाथ प्लाझामधील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र बँकेची यंत्रणा आणि शहर पोलीस स्थानकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास तरूणाला एटीएम फोडतांना पकडले आहे. शहर पोलीसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एटीएम फोडणार्‍या विजय बन्सी अहिरे वय 30 रा. खेडी बुद्रूक या संशयित तरूणाचे नाव आहे. शहरातील नाथा प्लाझा येथे स्टेट बँकेचे एटीएम आहे. या बँकेच्या एटीएम किंवा ते फोडून त्यातील रक्कम लांबविण्याचा प्रयत्न झाला की बँकेच्या हैदराबाद येथील कार्यालयात अलार्म वाजतो, व माहिती समजते. रविवारी रात्री नाथा प्लाझातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा फोन रविवारी 1.38 वाजेच्या सुमारास हैदराबाद येथून शहर पोलीस ठाण्यात खणाणला. ठाणे अंमलदार निलेश बडगुजर यांना फोनवरुन नाथा प्लाझा कॉम्प्लेक्समधील एटीएम फोडण्याचा प्रकार करत असल्याची माहिती मिळाली.

शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील गजानन बडगुजर व भास्कर ठाकरे यांना माहिती कळविली माहिती मिळताच दोघा कर्मचार्‍यांनी तत्काळ नाथा प्लाझा कॉम्प्लेक्स गाठले. कर्मचारी एटीएमकडे गेले, त्यापूर्वी एटीएममधून तोंडाला मास्क तसेच तोंडाला रुमाल तसेच पाठीवर बॅग लटकविलेला संशयित तरुण एटीएमच्या बाहेर पडला.

कर्मचारी गजानन बडगुजर यांनी तत्काळ मोबाईलमध्ये तरुणाचा फोटो काढला, यानंतर तरुणाने तोंडावरील मास्क काढले. तरूणावर संशय आल्याने बडगुजर व ठाकरे यांनी तरुणाला थांबवून ठेवत एटीएमच्या आतमध्ये जावून पाहणी केली असता, चारही बाजूने एटीएम तोडलेले दिसून आले. या त्याला ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले. व पोलीस निरिक्षकांना प्रकार कळविला. पोलीस निरिक्षक अरुण निकम यांच्यासह कर्मचार्‍यांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाची चौकशी केली असता, त्याने विजय बन्सी अहिरे असे नाव सांगितले. खेडी बुद्रूक येथील आंबेडकर नगरात राहतो. हातऊसनवारीवर 3 लाखांचे कर्ज घेतले. पैशासाठी लोकांचा तगादा सुरु आहे. परतफेड करण्यासाठी एटीएम फोडण्याचे कृत्य केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.

बॅगेत चोरीच्या साहित्यासह, दारुच्या बाटल्या
विजय अहिरे झडती घेतली असता, त्याच्याजवळ खिशात कटर तसेच बॅक तपासली असता, बॅकेत टेक्सो टेप, हातोडी, टॅमी, स्कू्र ड्रायव्हर, ग्रीपर, बांधकामात स्टाईल कापण्यासाठी वापरले जाणारे कटर मशीन हे साहित्य मिळून आले. विशेष म्हणजे बॅकेत दोन मद्याच्या सिलबंद बाटल्याही मिळून आल्या आहेत.

Exit mobile version