Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कार ट्रान्सफर प्रकरणी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी निलंबित

जळगाव-लाईव्ह ट्रेंडसन्यूज प्रतिनिधी | आमदार संजय सावकारे यांची कार परस्पर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर केल्याच्या प्रकरणात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश वामन पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.

आमदार संजय सावकारे यांची कार ही परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर परस्पर ट्रान्सफर केल्याचे प्रकरण खूप गाजले होते. २८ डिसेंबर रोजी आमदार सावकारे यांची कार परस्पर परब यांच्या नावे करण्यात आली होती. या प्रक्रियेत ओटीपीसाठी अशोक पाटील या आरटीओ एजंटचा नंबर वापरला गेला. त्यानंतर अशोक पाटीलसह प्रशांत भोळे व शेख अकील शेख रेहमान या तिघांवर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटकही केली होती. तर कामात कुचराई केल्या प्रकरणी चार कर्मचार्‍यांना निलंबीत देखील करण्यात आले होते. याच प्रकरणात वरिष्ठ अधिकार्‍यांनी देखील निष्काळजीपणा दाखविल्याचा आरोप केला होता.

या अनुषंगाने सहायक प्रादेशीक परिवहन अधिकारी गणेश पाटील यांनी अक्षम्य महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १०७९च्या नियम तीनचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानूसार त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) या अंतर्गत शासनाला प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करुन त्यांना तात्काळ निलंबित केले आहे. निलंबनाच्या कार्यकाळात गणेश पाटील यांचे मुख्यालय औरंगाबाद असणार आहे. कार्यालयाच्या परवानगीशिवाय त्यांना कार्यालय सोडता येणार नाही. या कालावधीत त्यांना खासगी नोकरी, व्यवयास करता येणार नाही, असे आदेशात नमूद केले आहे. राज्यपालांच्या आदेशाने ही कारवाई केली असून अव्वर सचिव म. रा. लांघी यांची स्वाक्षरी आहे. दरम्यान, या निलंबनामुळे आरटीओ विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Exit mobile version