Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍याला तीन वर्षे सक्तमजुरी

जळगाव प्रतिनिधी | चार अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍या पाळधी येथील इसमाला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

धरणगाव पाळधी गावातील एका दांपत्याने घराचे बांधकाम सुरू केले होते. त्यासाठी रशीद उर्फ पापा सलाम शेख (वय ४५, रा. पाळधी, ता. धरणगाव) याला काम देण्यात आले. रशीदने २९ मार्च २०१४ रोजी शेतकरी दांपत्याच्या मुलीस पिण्यासाठी पाणी मागत घरात प्रवेश केला. यानंतर त्याने घराचा दरवाजा बंद करून घेतला. शेतकर्‍याच्या मुलीसह तिच्या मैत्रिणी अशा १० ते १२ वयोगटातील तीन मुली या वेळी घरात होत्या. रशीदने या तीनही मुलींवर अत्याचार केला. याचवेळी आणखी एक मुलीने दार ठोठावले. रशीदने तिला घरात घेऊन तिच्यावरही अत्याचार केला. या वेळी एका मुलीच्या आजीने बाहेरून दरवाजा ठोठावला असता आतून प्रतिसाद मिळाला नाही. या आजीने खडसावून आवाज दिल्यानंतर रशीदने दरवाजा उघडला. यानंतर चारही मुली घराबाहेर पळून गेल्या. तर रशीदही बाहेर निघाला.

संतापजनक बाब म्हणजे यावेळी रशीदची आत्या शबनूरबी मुलींकडे पाहून हसत होती. याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र येथे दोघांच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे दोषारोप न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायाधीश एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षाने एकूण ९ साक्षीदार तपासले. यात चारही पीडित मुलींचा समावेश होता. पीडित मुलींनी घडलेला प्रकार न्यायालयात कथन केला. सुनावणीअंती न्यायालयाने रशीद याला दोषी धरून आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडित मुलींना देण्याचे आदेश न्यायालयाने केले आहेत. तर शबनूरबी हिला निर्दोष मुक्त केले. सरकार पक्षातर्फे ऍड. सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी तुषार मिस्तरी यांनी सहकार्य केले.

Exit mobile version