Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रीय महामार्गावर रूग्णवाहिका व रिक्षाची समोरासमोर धडक !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्गावर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या समोरील उड्डापुलावर रूग्णवाहिका आणि रिक्षाची समोरासमोर टक्कर झाली असून यात रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, चौपदरीकरण झालेल्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच नशिराबाद येथील टोल नाक्याच्या पुढे असणार्‍या रेल्वे उड्डाणपुलावर दोन अपघात झाले होते. यातील एका अपघातात तर तब्बल पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. यानंतर पुन्हा एकाचा मृत्यू झाला होता. आता याच्याच थोड्या पुढे पुन्हा भीषण अपघात झाला आहे.

आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास एमएच १४ सीएल ०७५५ या क्रमांकाची रूग्णवाहिका आणि एमएच १९ सीडब्ल्यू ०६३८ क्रमांकाच्या ऍपे रिक्षाची समोरा समोर धडक झाली. ही धडक इतकी भयंंकर होती की रूग्णवाहिका आणि रिक्षा दोन्ही उलटल्या. तर रिक्षाचा यात अक्षरश: चक्काचूर झाला आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमधील सहकार्‍यांनी धाव घेऊन जखमींवर उपचार केले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Exit mobile version