Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जलशक्ती अभियान यशस्वी करावे : जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

b3a9a063 cdc1 40a0 9851 d13d56015058

 

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलशक्ती अभियान (JSA) राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जलसंधारण आणि पाऊसपाणी संकलन, पारंपरिक व इतर पाण्याच्या संरचनांचे नूतनीकरण, पाणलोट क्षेत्र विकास यावर भर देण्यात येणार आहे. या अभियानाची एक जुलैपासून देशभरात सुरुवात झाली असून १५ सप्टेंबरपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात देखील सर्व यंत्रणांनी समन्वय अभियान यशस्वी करावे, निर्देश संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज दिले.

 

राज्यातील आठ जिल्ह्यातील २० तालुक्यात हे अभियान राबविले जाणार असून यात जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि यावल तालुक्यांचा समावेश आहे. या अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा आज जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी केंद्र शासनाच्या खाण मंत्रालयाच्या संचालक तथा अभियनाच्या समन्वयक श्रीमती फरीजा महेबुब नाईक, केंद्रीय जल व शक्ती संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस.एस.रोगटे उपस्थित होते.

 

बैठकीत अभियानासंदर्भात केलेल्या तयारीचा आणि विविध कामांचा आढावा घेताना, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी, अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कार्य करावे असे निर्देश संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले. जलसंवर्धनासाठी केंद्र व राज्य शासनाकडून संयुक्तरित्या हे अभियान राबविले जाणार आहे. जलसंवर्धन आणि पाऊस पाणी संकलनाच्या दृष्टीने जिल्ह्यात सध्या झालेली कामे, त्यांची सद्यस्थिती, त्यावर करावयाच्या उपाययोजना आदींवर भर दिला जाणार आहे. पाझर तलाव, तळे, ट्रेंच, छतावरील पाण्याचे संकलन आदी कामांवर यांत भर दिला जाणार आहे. यामुळे भविष्यात यावल व रावेर तालुक्यातील पाणी समस्या दूर होणार असल्याने, अभियानामध्ये जनतेचा सहभाग महत्वाचा आहे. त्यासाठी शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, माध्यम प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनाही सहभागी करुन घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

 

जलशक्ती अभियान हा केवळ शासकीय कार्यक्रम न राहता यात स्थानिक स्तरावरील गाव सरपंच, पंचायत स्तरावरील पदाधिकारी यांचाही सहभाग घेण्यात यावा असे आवाहन अभियानाच्या समन्वयक श्रीमती फरीजा महेबुब नाईक यांनी यावेळी केले. केंद्रीय जल व शक्ती संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस.एस.रोगटे यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे अभियानाचा उद्देश व साध्य करावयाचे उद्दीष्ट याबद्दल माहिती दिली. अभियानात स्थानिकांना सहभागी करुन घेण्यासाठी ९ जुलै रोजी पाल येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

बैठकीला फैजपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले, रोहयोचे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, उपविभागीय कृषी अधिकारी बी.जी.व्यवहारे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, भूजल विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक व्ही.एस.जवंजाळ, जळगांव पाटबंधारे विभागाचे सहायक अधीक्षक अभियंता आय.एस.पढत तसेच सर्व संबधित विभागाचे अधिकारी, जलसंधारणाचे कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version