Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जैन फाऊंडेशनचे साहित्य पुरस्कार जाहीर : राम सुतार यांना पहिला ‘जीवनगौरव’ (व्हिडीओ)

images 1

जळगाव, प्रतिनिधी | मराठी साहित्य क्षेत्रात मानाचे पान ठरलेल्या बहिणाबाई पुरस्कार, बालकवी ठोंबरे पुरस्कार आणि ना. धों. महानोर ह्या पुरस्कारांसाठी प्रतिथयश साहित्यिक, कवींची निवड आज (दि.६) येथे करण्यात आली. भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशन व बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील वाङमयीन क्षेत्रातील प्रतिभावंत, अनुभवसिद्ध लेखकांची कारकीर्द आणि बदलत्या साहित्य प्रवासाची सकारात्मक नोंद घेऊन ही निवड केली जाते. ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानीत डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या नऊ सदस्यीय समितीने जैन हिल्स येथे नुकत्याच (दि४) झालेल्या बैठकीत ही निवड केली.

 

या बैठकीस विशेष आमंत्रित म्हणून जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, पद्मश्री ना.धों. महानोर, तसेच निवड समिती सदस्य राजन गवस, डॉ. दिलीप धोंडगे, प्रभा गणोरकर, अनुराधा पाटील, शंभू पाटील हे सदस्य उपस्थित होते. २०१८-१९ या द्विवार्षिक पुरस्कारांसाठी श्रेष्ठ लेखिका म्हणून बहिणाई पुरस्कारासाठी मेघना पेठे (बाणेर-पुणे), श्रेष्ठ कवी म्हणून बालकवी ठोंबरे पुरस्कारासाठी अजय कांडर (कणकवली, जि. सिंधुदुर्ग) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना.धों. महानोर पुरस्कारासाठी रफिक सूरज (हुपरी, जि. कोल्हापूर) यांची यावेळी सर्वानुमते निवड करण्यात आली. आतापर्यंत या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे होते, परंतु यंदापासून या पुरस्काराची रक्कम वाढविण्यात येऊन ती एक लाख रुपये अशी करण्यात आली आहे.

पहिला जीवन गौरव पुरस्कार शिल्पकार राम सुतार यांना जाहीर

‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन’तर्फे यंदापासून सुरु करण्यात आलेल्या ‘स्व.कांताबाई जैन साहित्य-कला जीवनगौरव’ या नव्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ शिल्पकार, मूर्तिकार राम सुतार यांची निवड करण्यात आली असून तशी घोषणा साहित्य पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानपीठकार डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी आज (दि.६) केली. हा पुरस्कार व्दिवार्षिक पुरस्कार असून दोन लक्ष रुपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे याचे स्वरूप आहे.

या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरलेले ज्येष्ठ शिल्पकार, मूर्तिकार राम सुतार यांचा जन्म खान्देशातील गोंदूर (धुळे) येथे  झाला आहे. नर्मदा नदी किनारी सरदार सरोवर प्रकल्पाजवळ उभारण्यात आलेल्या सरदार पटेल यांच्या जगप्रसिद्ध आणि भव्य पुतळ्याचे डिझाईन श्री. सुतार यांनी साकारले होते. फाउंडेशनतर्फे दरवेळी कला आणि साहित्य क्षेत्रात अखिल भारतीय स्तरावरील कर्तृत्ववान ठरलेल्या ज्येष्ठ व्यक्तिंची निवड या पुरस्कारासाठी केली जाणार आहे.

 

 

Exit mobile version