Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ऊर्जा लेखापरीक्षण आणि सौर ऊर्जेवर कार्यशाळा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकीमध्ये ऊर्जा लेखापरीक्षण आणि सौर ऊर्जा या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्युत अभियांत्रिकी विभागातील प्रा. मनीष महाले यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विध्यार्थ्यांना सौर ऊर्जेचे महत्व सांगत, ऊर्जा लेखा परीक्षण कसे करावयाचे हे सांगितले. तसेच ऊर्जेची गरज सध्याच्या तुलनेत काही पटीत वाढेल आणि सध्या वीजनिर्माण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आण्विक ऊर्जा क्षेत्राने दिवसाला एक अशा गतीने अणुभट्ट्या उभारल्या तरी ही गरज पुरी होण्यासारखी नाही. शिवाय जपानमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जगानेही अणुप्रकल्पांचा फेरविचार करण्यास सुरवात केली आहे.

त्या पार्श्वभूमीवर सौरऊर्जेचा विचार केला असता एका तासात पृथ्वीवर पडणारी सौरऊर्जा ही रूपांतरित केल्यास आपली एका वर्षाची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी पुरेशी असते, मात्र हे प्रत्यक्षात आणण्यासाठी आणखी बऱ्याच संशोधनाची आवश्यकता आहे. अपारंपारिक आणि विशेषतः सौरऊर्जा क्षेत्रातील संशोधनावरील निधी तसेच जागरूकता दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याच्या पारंपारिक ऊर्जास्रोतांचे पर्याय फक्त अजून काही वर्षेच उपलब्ध असणार आहेत. शिवाय त्यांच्या अनेक नकारात्मक बाजूही आहेत. अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात सौरऊर्जेशिवाय वायुऊर्जा, टायडल, जिओथर्मल असे पर्याय आहेत.

मात्र, भविष्यकाळातील ऊर्जेची गरज काही अंशीच भागवण्याची क्षमता त्यात आहे. सध्या सौरऊर्जा क्षेत्रातील संशोधन हे मुख्यतः सौरऊर्जा ही पारंपरिक ऊर्जास्रोतांपेक्षा कमी खर्चिक करण्यासाठी चालू आहे. जपान, जर्मनी या सौरऊर्जेतील परंपरागत शिलेदारांसकट अमेरिका शिवाय चीन आणि भारतानेही याबाबत पुढाकार घेतला आहे. सौरऊर्जा निर्मितीत आणि नंतर वापरातही कुठल्याही प्रकारचे अपायकारक वायू वातावरणात सोडले जात नाहीत असे त्यांनी कार्यशाळेत नमूद केले.

या कार्यशाळेसाठी विद्युत अभियांत्रिकीच्या विभागप्रमुख प्रा. बिपासा पात्रा, प्रा. मयुरी गचके, प्रा. मधुर चव्हाण आदींनी सहकार्य केले. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version