Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘त्या’ वैद्यकीय व्यावसायिकांची इन्कम टॅक्सच्या पथकांकडून कसून चौकशी

जळगावात एकाच वेळेस टाकण्यात आल्या आयकर खात्याच्या धाडी

जळगाव प्रतिनिधी । आज सकाळपासून शहरातील सात वैद्यकीय व्यावसायिकांवर एकाच वेळेस धाडी टाकण्यात आल्या असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

याबाबत आयकर खात्याच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आयकर खात्याच्या पथकांनी शहरातील काही हॉस्पीटल्सवर धाडी टाकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात सूत्रांनी माहिती दिली की, जळगाव शहरातील सात ख्यातप्राप्त वैद्यकीय व्यावसायिकांवर धाडी टाकण्यासाठी नाशिक आणि धुळे येथील पथकांना पाचारण करण्यात आले होते. आज सकाळी नऊच्या सुमारास ही पथके पहिल्यांदा आयकर खात्याच्या कार्यालयात आले. यानंतर आयएमआर महाविद्यालयाच्या मैदानावर ही पथके आली. येथेच त्यांना नेमक्या कोणत्या हॉस्पीटल्सवर धाडी टाकावयाच्या आहेत ? याची माहिती देण्यात आली. यानंतर सकाळी दहाच्या सुमारास शहरातील सात वैद्यकीय व्यावसायिकांवर एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या आहेत. सुमारे साडेपाच तास उलटूनही अजूनही सर्व पथके संबंधीतांची कसून चौकशी करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रस्तुत प्रतिनिधीने पथकातील अधिकार्‍यांना विचार केली असता, त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. दरम्यान, शहरात एकाच वेळी सात ख्यातप्राप्त वैद्यकीय व्यावसायिकांवर प्राप्तीकर खात्याच्या टाकण्यात आलेल्या धाडींबाबत मोठ्या प्रमाणात गोपनीयता बाळगली जात असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, आयकर खात्याने उत्तर महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रावर एकाच दिवशी छापे टाकल्याचे निदर्शनास आले आहे. आजच नाशिक आणि धुळे येथे धाडी टाकण्यात आल्या असून यासोबत जळगावच्या व्यावसायिकांवरही छापे टाकण्यात आले आहेत. याबाबत अद्याप तपशील समोर आला नसला तरी यामुळे प्रचंड खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version