Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आयटी क्षेत्रात वर्षभरात दोन लाख कर्मचाऱ्यांची कपात

employ

नवी दिल्ली वृत्तसंस्था । आयटी क्षेत्रातील अनेक कंपन्या सध्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी कपात थांब नसून वर्षभरात आयटी क्षेत्रात दोन लाख कर्मचाऱ्यांची कपात होईल, अशी शक्यता आयटी क्षेत्रातील अधिका-यांनी व्यक्त केली आहे. वाढता व्यवस्थापन खर्च कमी करण्यासाठी या कंपन्यांनी अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे धोरण अवलंबले आहे.

केवळ लहानसहानच नाहीत तर इन्फोसिस व कॉग्निझंटसारख्या बड्या कंपन्यांनीही गेल्या सहा महिन्यांत हजारो कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केले आहे. नॅसकॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज) म्हणण्यानुसार नोकरकपातीचा हा कल आणखी तीन वर्षे सुरू राहण्याची शक्यता आहे. आयटी कंपन्यांनी आपल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांना काढण्याचे धोरण आखले असून हा कल आणखी तीन वर्षे सुरू राहील. येत्या वर्षभरात यामुळे एक ते दोन लाख कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार असून कंपनीतील मध्यम स्तराच्या कर्मचाऱ्यांना या नोकरकपातीची प्रामुख्याने झळ बसेल असे संकेत वर्तवण्यात येत आहेत.

‘आयटी क्षेत्रात दररोज बदल होत आहेत. या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी नवे तंत्र, कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. हे आव्हान पेलू न शकणारे मध्यम स्तरातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या टिकणार नाहीत.’ देशातील आयटी कंपन्यांमध्ये ८ ते १२ वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेले एकूण १४ लाख कर्मचारी असून यातील अत्यल्प कर्मचाऱ्यांना नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.

Exit mobile version