Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही करण्याबरोबरच ग्रंथप्रेमीसुद्धा बनविणे शिक्षक पालकांचे आद्य कर्तव्य – चंद्रकांत भंडारी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही करण्याबरोबरच ग्रंथप्रेमी सुद्धा बनविणे शिक्षक व पालकांचे आद्य कर्तव्य आहे.” असे प्रतिपादन साहित्यिक तथा समीक्षक चंद्रकांत भंडारी यांनी केले.

जळगाव येथे नुकतेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त पुस्तकांचे भव्य प्रदर्शन व विक्री शुभारंभ ज्येष्ठ कवयित्री श्रीमती माया धुप्पड यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना भंडारी बोलत होते.

उद्घाटनाप्रसंगी सचिन जोशी, नितीन भोकरे, वैभव सूर्यवंशी यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पुढील मार्गदर्शनात चंद्रकांत भंडारी म्हणाले की, वाचन संस्कृती कमी होते. यावर बोलण्यापेक्षा वाचलेल्या पुस्तकांवर घरोघरी चर्चा होणे महत्त्वपूर्ण आहे. शाळकरी मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी विविध पुस्तकांची ओळख करून देणे व नवनवीन पुस्तकांची खरेदी करून स्वागत करणे सर्वांची जबाबदारी असून सध्या काळाची नितांत गरज आहे.”

इंजिनीयर वैभव सूर्यवंशी यांनी, ‘समृद्ध वाचन कसे करावे’ याविषयी आपले विचार मांडले .उद्घाटनपर मार्गदर्शनात सुप्रसिद्ध बालकवयित्री माया धुप्पड यांनी, “वाचन संस्कृती वर्धिष्णू करण्यासाठी प्रकाशकांनी सुजाण वाचकांशी कसा संवाद साधावा व कोणते उपक्रम राबवावे.” यासाठी मार्गदर्शन केले.

सचिन जोशी यांनी जळगाव शहरातील परिवर्तन संस्था संचलित पुस्तक भिशीअन्वये वाचक कसे घडवले व वाचन संस्कृती वाढवण्यासाठी केलेल्या विविध दर्जेदार उपक्रमांवर उहापोह केला. मॉलच्या खरेदीपेक्षा पुस्तक प्रदर्शनातील खरेदी मुलांकडून करून घेऊन त्यांच्यात पुस्तक प्रेम वाढवत वाचन संस्कार स्वतःच्या मुलावर कसे रुजविले याबाबत तसेच अन्य संबधित अभिनव प्रयोगांचे किस्से सांगितले. प्रदर्शन आयोजनाच्या सहकार्यासाठी वरुणराज पवार व गायत्री पवार यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version