दिपनगर, ता. भुसावळ- योगेश तळेले | येथील मुख्य अभियंत्यांच्या कृपेने परप्रांतीय ठेकेदाराच्या पदरात पध्दतशीरपणे ४२ कोटींची कामे पडणार असून याचा मोठा फटका स्थानिक भूमीपुत्र लहान कंत्राटदारांना पडणार आहे.
लाईव्ह ट्रेंड्स न्युज ने स्थानिक परप्रांतीय कंत्राटदार आणि म.रा.वि.नि.कं.लि.मधील षडयंत्राची पोलखोल केल्याचे प्रकरण ताजे असतांना भु.औ.वि.नि.केंद्राचे मुख्य अभियंता भदाणे यांनी स्थानिक परप्रांतीय कंत्राटदारासाठी केलेल्या कामगिरीची चर्चा सर्व स्थानिक ठेकेदारांमध्ये सुरू आहे. म.रा.वि.नि.कं.लि.ने विद्युत केंद्राच्या नितांत गरजेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी दिला गेलेल्या निधीचा अपव्यय कसा केला जातो याचे हे जिवंत उदाहरण होय.
वीजनिर्मितीसाठी खरोखर गरजेचे असलेल्या लहान लहान कामांचे कंत्राटाची जी कामे स्थानिक ठेकेदार यांच्या द्वारा केली जातात त्या कामांच्या निविदा निधी अभाव असल्याचे कारण सांगून मुख्य अभियंता यांच्याकडून थांबविण्यात आलेल्या आहेत. तर दुसरीकडे वीजनिर्मितीसाठी काहीही एक गरज नसलेले काही कंत्राट ज्यांच्या निविदाची एकत्रीत किंमत रू.४२ कोटी १८ लाख ऐवढी असून एकही निविदेमध्ये कोणताही स्थानिक कंत्राटदार पात्र होणार नाही आणि सर्व कामांचे कंत्राट हे परप्रांतीय कंत्राटदारालाच मिळतील अशी ही खेळी खेळली गेलेली आहे.
मुख्य अभियंता यांनी भु.औ.वि.केंद्राचा पदभार घेऊन अजून दोन महिने होत नाही तोपर्यंत स्थानिक परप्रांतीय कंत्राटदारासाठी केलेले हे कार्य नक्कीच उल्लेखनीय आहे. विशेष बाब अशी की ही सर्व गरज नसलेली कामे 2 x 500 मे.वॅ.च्या कोळसा हातळणी विभागाशी निगडीत आहे.भु.औ.वि.नि.केंद्रा मध्ये मुख्य अभियंता हे आपल्या पदाचा गैरवापर करून शासकीय निधीचा अपव्यय करीत आहे.एकाच विभागात असा निधीचा गैरवापर तर दुसऱ्या विभागांचे काय? असा प्रश्न उद्भवत आहे.तसेच भु.औ.वि.केंद्रामध्ये अधिपत्य गाजवित असलेल्या परप्रांतीय कंत्राटदारावर लगाम लागेल की नाही? स्थानिक ठेकेदारांना न्याय मिळेल की नाही?अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी आहेत. याची उत्तर शोधल्यास अजून मोठा घोळ समोर येण्याची शक्यता आहे. तूर्तास स्थानिक कंत्राटदारांना सर्वांनी वाऱ्यावर सोडल्याचे मन सुन्न करणारे चित्र दिसून येत आहे.