Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

IPL 2020 : आरसीबीची विजयी सुरुवात

दुबई-रॉयल चॅलेंजर बेंगलोरने ठेवलेल्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना सनराईजर्स हैदराबादचा डाव १५३ धावात संपुष्टात आला.

सलामीवीर देवदत पडीकल आणि फिंच यांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या ९० धावांच्या भागीदारीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिल्या सामन्यात १६३ धावा केल्या. दार्पणाचा आयपीएल सामना खेळणाऱ्या देवदत पडीकलने फिंचच्या साथीने हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर रॉयल चॅलेंजर्सच्या मधल्या फळीने निराशा केल्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पडीकल आणि डिव्हीलियर्स यांनी सामन्यात अर्धशतकं झळकावली. यानंतर मधल्या षटकांमध्ये बंगळुरुची धावगती पुन्हा एकदा मंदावली. विराट-एबी डिव्हीलियर्स यांसारखे अनुभवी फलंदाज असतानाही हव्या त्या गतीने धावा झाल्या नाहीत. विराट कोहलीही मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात नटराजनच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर राशिद खानकडे झेल देऊन माघारी परतला. त्याने १४ धावा केल्या.

दुसऱ्या बाजूने डिव्हीलियर्सने लौकिकाला साजेसा खेळ करत फटकेबाजी करुन आपलं अर्धशतक साजरं केलं. त्याने ५१ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात चोरटी धाव घेताना तो धावबाद झाला. हैदराबादकडून विजय शंकर, अभिषेक शर्मा आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात अडखळत झाली. कर्णधार वॉर्नर धावबाद होऊन माघारी परतला. यानंतर मनिष पांडे आणि जॉनी बेअरस्टो जोडीने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी मैदानात स्थिरावल्यानंतर फटकेबाजी सुरुवात केली असतानाच पांडे माघारी परतला. यानंतरही बेअरस्टोने एक बाजू लावून धरत फटकेबाजी सुरु ठेवली. बेअरस्टोने ४३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांनिशी ६१ धावा केल्या. युजवेंद्र चहलने एकाच षटकात बेअरस्टो आणि विजय शंकरला माघारी धाडत हैदराबादला धक्का दिला.

यानंतर मधल्या फळीतला एकही फलंदाज मैदानावर फारसा स्थिरावू शकला नाही. युजवेंद्र चहलने ३ बळी घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याला नवदीप सैनी आणि शिवम दुबे यांनी २-२ तर स्टेनने १ बळी घेत चांगली साथ दिली.

Exit mobile version