Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोकेश राहुलच्या फटकेबाजीने पंजाबचा दणदणीत विजय

दुबई: कर्णधार लोकेश राहुलची फटकेबाजी व दर्जेदार गोलंदाजी यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर तब्बल ९७ धावांनी विजय मिळवला.

नाणेफेक जिंकून विराट कोहलीनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबकडून कर्णधार लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी अर्धशतकी सलामी दिली. त्यानंतर निकोलस पूरन आणि ग्लेन मॅक्सवेल लवकर बाद झालेत. मात्र दुसऱ्या बाजूनं राहुलची शानदार फटकेबाजी सुरू होती. राहुल शतकाजवळ असताना विराटनं दोनदा त्याचे झेल सोडले. त्यानंतर राहुलनं थेट टॉप गियर टाकला. त्यामुळे अखेरच्या पाच षटकांमध्ये ७० हून अधिक धावांचा पाऊस पडला.

राहुलच्या १३२ धावांच्या नाबाद खेळीमुळे पंजाबनं २०६ धावा केल्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या आरसीबीची सुरुवात अतिशय खराब झाली. अवघ्या ४ धावांमध्ये आरसीबीचे ३ फलंदाज माघारी परतले. विराट कोहली अवघी १ धाव काढून बाद झाला. मोहम्मद शमी आणि शेल्डन कॉट्रेल यांनी सुरुवातीलाच पंजाबला धक्के दिले. यानंतर फिंच आणि डिव्हिलयर्सनं ४९ धावांची भागिदारी रचली.

यानंतर रवी बिश्नोईनं २० धावांवर फिंचचा त्रिफळा उडवला. मुरुगन अश्विननं डिव्हिलियर्सला २८ धावांवर बाद केलं. प्रमुख फलंदाज माघारी परतत असताना वॉशिंग्टन सुंदरनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र बिश्नोईनं ३० धावांवर त्याची खेळी संपवली. बिश्नोई आणि अश्विननं प्रत्येकी ३ गडी बाद केले. आरसीबीचा संपूर्ण डाव १०९ धावांवर संपुष्टात आला.

पंजाबच्या विजयात मोलाचं योगदान देणाऱ्या कर्णधार लोकेश राहुलला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या मोठ्या विजयामुळे पंजाबनं गुणतालिकेत थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर आरसीबीची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. दारुण पराभवामुळे आरसीबीचा नेट रनरेट उणे २.१७५ इतका झाला आहे.

Exit mobile version