Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात भाजपमधील गटबाजीचे जाहीर प्रदर्शन

जळगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरणगाव व जळगाव येथील दौर्‍यात गुळमुळीत पवित्रा घेत काही लोकप्रिय घोेषणा निश्‍चितच केल्या. मात्र पक्षातील गटबाजीला थांबविण्यात तेदेखील अपयशी ठरले. या अंतर्गत कलहाचा पक्षाच्या आगामी वाटचालीवर नक्कीच परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल धरणगाव व भुसावळ येथे सभा घेतल्या. यात धरणगाव येथे त्यांनी जनजाती संमेलनास संबोधित करून क्रांतीवीर खाजाजी नाईक यांच्या स्मृती आराखड्यासाठी निधीची घोषणा केली. तर भुसावळातील सभेत बेघरांना घरे देण्याची घोषणा करत खासदार रक्षा खडसे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. मात्र या दोन्ही सभांमधील विसंगती लक्षात घेण्याची गरज आहे. खरं तर शेतकर्‍यांच्या लाँच मार्चमुळे ना. गिरीश महाजन हे दोन्ही कार्यक्रमांना येऊ शकले नाहीत हे कुणीही समजून घेऊ शकतो. मात्र त्यांच्या समर्थकांनी धरणगाव येथील सभेत हिरीरीने उपस्थिती लाऊन भुसावळातील कार्यक्रमात मारलेली दांडी ही अनेकांच्या पचनी पडलेली दिसत नाही.

विशेष करून भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी भुसावळातील सभेकडे फिरवलेली पाठ ही आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. यासोबत आमदार चंदूलाल पटेलदेखील भुसावळात आलेले नाही. भाजप जिल्हाध्यक्ष वाघ हे आधी खडसेंच्या मर्जीतले असले तरी आता ते ना. गिरीश महाजन यांच्या गटातील मानले जातात. या पार्श्‍वभूमिवर, थेट मुख्यमंत्र्यांची सभा असूनही येणे टाळल्यामुळे भाजपमधील भाऊबंदकी आता टोकाला पोहचल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर उपाययोजना न केल्यास पक्षाला याचे निवडणुकीत गंभीर परिणाम भोगावे लागतील हे उघड आहे.

Exit mobile version