Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राणा यांच्या निवासस्थानी अनधिकृत बांधकामाची पाहणी

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा –  अमरावतीचे आ. रवी राणा व खा. नवनीत राणा यांच्या खार येथील निवासस्थानाची नपा अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी अनधिकृत बांधकाम प्रकरणी राणा दाम्पत्याला मनपा नोटीस देणार आहे. तसेच मनपा कडून लीलावती रुग्णालयाला देखील नर्सिग होम कायद्यांतर्गत  नोटीस देण्यात आली आहे.

राणा दाम्पत्याच्या निवासस्थान असलेल्या खार येथील १४ व्या रस्त्यावरील ‘लाव्ही’ इमारतीत पालिकेच्या ‘एच-पश्चिम’ विभागाने नोटीस दिली आहे. या इमारतीतील आठव्या मजल्यावर राणा यांची सदनिका असून आठव्या मजल्याची पाहणी करण्यासाठी पालिकेने पूर्वसूचना दिली होती. त्यानुसार दोन दिवस पालिकेच्या पथकाने पाहणीसाठी निवासस्थानाला भेट दिली होती. मात्र त्यांचे घर बंद असल्याने पथकाने सोमवारी त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत निवासस्थानाची पाहणी केली. पालिकेच्या पथकाने केलेल्या पाहणीत राणा दाम्पत्याच्या निवासस्थानात अनधिकृत बांधकाम असल्याचे पथकाला आढळून आले आहे. या प्रकरणी पालिकेकडून राणा यांना लवकरच पालिका अधिनियमानुसार नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

लीलावती रुग्णालयाला नोटीस देत मागविला खुलासा
खा. नवनीत राणा यांच्या मानदुखीवर उपचार घेण्यासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी एमआरआय काढतानाची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. रुग्णालय प्रशासनाने छायाचित्रे काढण्यास परवानगी कशी दिली? असा प्रश्न माजी महापौर किशोरी पेडणेकर व शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी लीलावती रुग्णालय प्रशासनाला विचारला होता. तर पालिकेच्या ‘एच-पश्चिम’ विभाग कार्यालयाने लीलावती रुग्णालयालाही नर्सिग होम कायद्यांतर्गत नोटीस पाठविली आहे. एमआरआयला जाताना छायाचित्रे काढणे हे वैद्यकीय नैतिकतेमध्ये बसत नसल्याचे या नोटीसीत म्हटले आहे. तसेच याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून खुलासा मागवण्यात आला असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

 

 

Exit mobile version