Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नवीन प्रांत व तहसील इमारत बांधकामाची मंत्री अनिल पाटील यांच्याकडून पाहणी

अमळनर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील जुन्या पोलीस वसाहतीच्या जागेत निर्माण होत असलेल्या नवीन प्रांत व तहसील कार्यालयाच्या इमारत बांधकामाची राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांनी केली पाहणी, याच इमारतीच्या शेजारी सर्व शासकीय कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी यावेळी दिली.

शहरातील जुनी पोलीस वसाहत येथे मंत्री अनिल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुर केलेल्या ११ कोटी निधीतील अमळनेर तालुका तहसिल व प्रांत कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असून सदर काम प्रगतीपथावर आहे. सर्व सुविधायुक्त व भव्य अशी सदर इमारत होत आहे. सदर कामाची पाहणी मंत्री पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन केली. यावेळी काही सूचना देखील त्यांनी अधिकारी वर्गास केल्या. दरम्यान याच प्रांत व तहसिल इमारतीच्या शेजारी लवकरच अमळनेर शहरातील सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी एकाच छताखाली यावेत म्हणून प्रशासकीय इमारतीसाठी सुमारे १४ कोटी निधी मंजूर झाले असून या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकामही लवकरच सुरू होईल अशी माहिती मंत्री पाटील यांनी यावेळी दिली.

दरम्यान दोन्ही इमारतींचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर जवळ जवळ सर्वच शासकीय कार्यालये एकाच प्रांगणात येणार असल्याने नागरीकांना शासकीय कामे करण्यासाठी करावी लागणारी पायपीट थांबणार आहे, परिणामी वेळेची व पैशाची देखील बचत होऊन सर्वसामान्य लोकांचे श्रम वाचणार आहे.यामुळे सदर दोन्ही नव्या इमारती अमळनेर तालुक्यातील जनतेसाठी वरदान ठरणार आहेत.

 

सदर पाहणीप्रसंगी बाजार समितीचे संचालक भोजमल पाटील,पं.स.चे माजी सभापती श्याम अहिरे, एस.टी. कामगार नेते एल.टी. पाटील,व्यापारी सेलचे अध्यक्ष विजय जैन,महेश पाटील,प्रा सुनिल पाटील यासह इतर उपस्थित होते.

Exit mobile version