माजी सैनिकाला मारहाण प्रकरणी खा. उन्मेष पाटलांच्या चौकशीचे आदेश

मुंबई वृत्तसंस्था । २०१६ साली माजी सैनिकाला मारहाण केल्याच्या कथित प्रकरणात तेव्हाचे आमदार आणि विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या चौकशीचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

२०१६ मध्ये तत्कालीन भाजप आमदार आणि सध्याचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी माजी सैनिकाला कथितरीत्या मारहाण केली होती. उन्मेष पाटील आणि सहकार्‍यांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप माजी सैनिक सोनू महाजन यांनी केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल न केल्यामुळे संबंधीतांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने गत वर्षाच्या शेवटी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यानुसार गुन्हा दाखल झाला असला तरी यात पुढे कोणतीही कारवाई झालेली नाही. या अनुषंगाने संबंधीत प्रकरणाची ४ वर्षांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी चौकशीचे आदेश दिले.

या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, तत्कालीन भाजप सरकारने महाजन यांची तक्रारही नोंदवली नव्हती. या प्रकरणात आमच्याकडे खूप पत्रे आली. यामुळे आता या प्रकरणाची चौकशी केली जाईल. २०१९ मध्ये हायकोर्टाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल झाली. तरीही कायदेशीर कार्यवाही झाली नव्हती. आता जळगावच्या पोलिस अधीक्षकांना या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत.

Protected Content