Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रवीण चव्हाण यांच्या बीएचआरमधील ‘त्या’ कनेक्शनची चौकशी सुरू ! :फडणवीस

मुंबई लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रवीण चव्हाण हे आधी ‘बीएचआर’चे संस्थापक प्रमोद रायसोनी यांचे वकील असतांना याच गैरव्यवहारात त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळाली असून याबाबत आपण चौकशी करत असल्याची माहिती आज देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर आपल्याकडे अजून भरपूर व्हिडीओज असून याची फॉरेन्सीक चाचणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्या कार्यालयात तेजस मोरे नावाच्या जळगाव येथील व्यक्तीने घड्याळाच्या माध्यमातून छुपे चित्रीकरण केल्याचा दावा केला. तसेच या व्हिडीओजमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला. यावर माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले.

या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर फडणवीस म्हणाले की, ”प्रवीण चव्हाण हे वकील असले तरी मी देखील वकील असल्याचे त्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. ते काय युक्तीवाद करतील याची माहिती आपल्याला आधीच होती. यामुळे आम्ही आधीच योग्य ती काळजी घेतली आहे. आम्ही विधानसभाध्यक्षांकडे पेन ड्राईव्हमध्ये दिलेल्या पुराव्यांच्या जोडीला अजून नवीन पुरावे जमा केले असून ते आमच्याकडे आहेत. यातील व्हिडीओज हा आधीच फॉरेन्सीककडून प्रमाणीत करण्यात आलेले आहे. राज्य सरकार याची चौकशी करणार नाही हे आम्हाला माहित आहे. यामुळे सीबीआयकडे चौकशी गेल्यानंतर आम्ही हे सर्व पुरावे सीबीआयला देणार आहोत.”

फडणवीस पुढे म्हणाले की, ”प्रवीण चव्हाण यांची अनेक प्रकरणे आमच्याकडे आहेत. जळगाव येथील बीएचआर सहकारी पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात ते सरकारी वकील आहेत. मात्र आश्‍चर्याची बाब म्हणजे हेच प्रवीण चव्हाण आधी बीएचआरचे संस्थापक प्रमोद रायसोनी यांचे वकील होते. या कनेक्शनची माहिती कालच आपल्याला मिळाली असून याबाबत आपण सखोल चौकशी करत असल्याचे ते म्हणाले. मी विधानसभे गौप्यस्फोट केल्यानंतर प्रवीण चव्हाण यांनी दोन दिवस मौन का बाळगले ?” असा प्रश्‍न देखील त्यांनी उपस्थित केला.

Exit mobile version