Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्राम

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव महाविद्यालयात बी.बी.ए व बी.सी.ए मधील प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा इंडक्शन प्रोग्राम (Induction Program) घेण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी गणपती व सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी केले व विद्यार्थ्यांना संबोधताना म्हणाले की, शालेय जीवनातून महाविद्यालयात व विद्यापीठात प्रवेश करणे हा सर्व विद्यार्थ्यांच्या जीवनामधील आव्हानात्मक बदल असतो. विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी विचारसरणी असते व महाविद्यालयाबद्दल कमी ज्ञान असते.

तसेच काही विद्यार्थ्यांमध्ये भीती, लाजळूपणा, काळजी इत्यादी असतो. आणि हीच भीती, लाजळूपणा, काळजी इत्यादी विद्यार्थ्यांच्या मनामधून काढून टाकून त्यांचे या उच्च शिक्षणात स्वागत करून विद्यार्थ्यांना महाविद्यालयाबद्दल माहिती देणे, त्यांना त्यांच्या जीवनामधील नवीन भूमिकेसाठी तयार करणे व विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, प्रेरणा निर्माण करुन एक यशस्वी नागरिक तयार करणे, असा या Induction Program चा हेतू आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकास, निरंतर वाचन, संभाषण कौशल्य यावर जास्त भर दिला पाहिजे. येणाऱ्या तीन वर्षात जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करा व स्वतःमध्ये विशेषसद्गुण प्राप्त करा, आपली क्षमता वाढवा जेणेकरून कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे काम करता येईल. दररोज इंग्लिश वृत्तपत्र वाचण्यावर जास्त भर द्या जेणेकरून संभाषण कौशल्य सुधारण्यास मदत होईल असे त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी महाविद्यालयाचे प्रा. प्राजक्ता पाटील यांनी गोदावरी फाऊंडेशन व गोदावरी फाऊंडेशन संचालित महाविद्यालय तसेच गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यलयाबद्दल माहिती दिली व महाविद्यालयाच्या शिक्षकांची ओळख करून दिली. यासोबत बी.बी.ए चा अभ्यासक्रम, परीक्षेची गुणप्रणाली, क्रेडिट पॉईंट्स इत्यादी विषयी माहिती दिली तर प्रा. मिताली शिंदे यांनी बी.सी.ए च्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे दोन सत्रात आयोजन केले होते. पहिल्या सत्रामध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना महाविद्ययाबद्दल, अभ्याक्रमाबद्दल माहिती दिली गेली. दुसऱ्या सत्रात मॅनेजमेंट गेम खेळले गेले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूमिका नाले व श्रध्दा रॉय या विद्यार्थिनीने केले. आभारप्रदर्शन भूमिका नाले या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाचे कामकाज प्रा. अश्विनी सोनवणे यांनी केले. यावेळी बी.बी.ए व बी.सी.ए च्या प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाच्या Dy. Director डॉ. नीलिमा वारके व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version