Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतीय महिलांचा विंडिजवर १० गडी राखून विजय

indian teem women

मुंबई वृत्तसंस्था । भारत आणि वेस्ट इंडिया महिला क्रिकेट संघांमधील दुसर्‍या टी-२० सामन्यात भारताने विंडीजचा पराभव केला. दुसर्‍या सामन्यात भारताने विंडीजचा १० गडी राखून पराभव करत ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. विंडीजच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण त्यांच्या फलंदाजांनी कर्णधाराला निराश केले.

सलामीवीर स्टेसी किंग (७), शेरमाईन कॅम्पबेल (०) या दोघी स्वस्तात बाद झाल्या. सलामीवर हेले मॅथ्यूज आणि छीडन नेशन या दोघींनी सावध खेळ करत चांगली कामगिरी केली. त्या दोघींनी आश्वासक भागीदारी रचायला सुरूवात केली, पण तेवढ्यात मॅथ्यूज बाद झाली. तिने २ चौकार लगावत ३५ चेंडूत २३ धावा केल्या. त्यानंतर नेशनने मॅकलीनच्या साथीने काही काळ डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. नेशन सर्वाधिक ३२ धावा करून बाद झाली. तिने ३ चौकार लगावले. तर मॅकलीनने १७ धावा केल्या. बाकीच्या फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. त्यामुळे विंडिजला केवळ १०३ धावांपर्यंतच मजल मारता आली. दिप्ती शर्माने १० धावांत ४ बळी टिपले. १०४ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाने एकही गडी गमावला नाही. भारताची सलामी जोडी शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनीच भारताला विजय मिळवून दिला. शफालीने ३५ चेंडूत १० चौकार आणि २ षटकार लगावत नाबाद ६९ धावा केल्या. स्मृती मंधानानेही तिला उत्तम साथ दिली. तिने २८ चेंडूत ४ चौकारांसह नाबाद ३० धावा केल्या. या दोघींनी केवळ १०.३ षटकात भारताला १० गडी राखून विजय मिळवून दिला. दिप्ती शर्माला गोलंदाजीतील दमदार कामगिरीमुळे सामनावीर घोषित करण्यात आले.

Exit mobile version