Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिला हॉकीत कांस्यपदक हुकले; सामना हरला मात्र मने जिंकली !

टोकियो वृत्तसंस्था | पुरूष संघापाठोपाठ भारताच्या महिला हॉकी संघाला कांस्यपदक मिळवण्याची संधी मिळाली असली तरी ब्रिटनने आजच्या सामन्यात ४-३ असा पराभव केल्याने याचा स्वप्नभंग झाला आहे. मात्र आपल्या संघाने जोरदार खेळ करून रसिकांची मने जिंकली आहेत.

उपांत्य फेरीतील पराभवाचे नैराश्य विसरून आज भारतीय संघाने ग्रेट ब्रिटनविरूध्दच्या सामन्यात जोरदार खेळ केला. खेळाच्या पूर्वार्धात ब्रिटनने जोरदार आक्रमकता दाखविली. प्रारंभी हाना मार्टीन हिने गोल करून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. रॉबर्टसन हिने दुसरा गोल करून ही बढत २-० अशी वाढविली. यानंतर मात्र भारताने अतिशय जोरदार आक्रमक चाली रचल्या. गुरजीत कौरने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून बढत कमी केली. यानंतर गुरूजीतनेच गोल करून २-२ अशी बरोबरी केली. दुसर्‍या क्वॉर्टरच्या शेवटच्या क्षणांमध्ये वंदना कटारियाने गोल करून ही बढत ३-२ अशी वाढविली.

यानंतर मात्र तिसर्‍या क्वॉर्टरच्या प्रारंभी ब्रिटनने गोल करून ३-३ अशी बरोबरी केली. या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांनी एकमेकांवर जबरदस्त आक्रमण केले. मात्र गोल करण्यात कुणीही यशस्वी झाला नाही. तर चौथ्या क्वॉर्टरमध्येही प्रचंड चुरस पाहण्यासाठी मिळाली. ब्रिटनला लागोपाठ पेनल्टी कॉर्नर मिळाला. यातील एका पेनल्टी कॉर्नरवर गोल करून ब्रिटनने ४-३ अशी आघाडी घेतली. ही आघाडी भारतीय संघाला भरून काढता आली नाही. परिणामी भारतीय संघाने हा सामना ४-३ असा गमावला.

आजच्या सामन्यात भारताला विजय मिळाला असता तर कांस्यपदक मिळाले असते. हे महिला हॉकी संघाचे आजवरचे एकमेव पदक असते. मात्र असे झाले नाही. अर्थात, ऑलींपीकमधील चौथा क्रमांक देखील भारतीय संघाचे सर्वोत्तम कामगिरी बनली आहे. यातच संघाने अतिशय उत्तम कामगिरी करून भारतवासियांची मने जिंकली आहेत.

Exit mobile version