Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतीय क्रिकेटला पुन्हा फिक्सींगचा विळखा – गांगुली

sourav ganguly

बंगळुरू, वृत्तसंस्था | कर्नाटक प्रिमीअर लिग स्पर्धेत समोर आलेल्या स्पॉट फिक्सींगच्या प्रकरणानंतर, भारतीय क्रिकेट पुन्हा एकदा फिक्सींगच्या सावटाखाली आले आहे. खुद्द बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेच याची कबुली दिली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत’ बुकीने एका खेळाडूशी संपर्क साधल्याची माहिती गांगुलीने दिली. तो रविवारी बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर पत्रकार परिषदेत बोलत होता.

 

रविवारी कर्नाटक विरुद्ध तामिळनाडू हा मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या स्पर्धेत रविचंद्रन आश्विन, शिखर धवन, लोकेश राहुल, मनिष पांडे यांसारखे अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. मात्र कोणत्या खेळाडूशी बुकीने संपर्क साधला याबाबत अधिक बोलण्यास गांगुलीने नकार दिला.

क्रिकेटमध्ये फिक्सींग आणि भ्रष्टाचारासारखे प्रकार थांबावेत यासाठी बीसीसीआय पूर्णपणे प्रयत्नशील आहे. फिक्सींगच्या आरोपामुळे डागाळलेली कर्नाटक प्रिमीअर लिग बीसीसीआयने तात्पुरती थांबवली असून, तामिळनाडू प्रिमीअर लिग स्पर्धेतील दोन संघावर बंदीची कारवाई करण्यात आलेली आहे. बीसीसीआय आणि आयसीसीचे भ्रष्टाचार विरोधी पथक सध्या या घटनांची चौकशी करत आहे. मात्र भविष्यात हे प्रकार थांबले नाहीत तर आपल्याला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल, असे मतही सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे.

Exit mobile version