Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारताला ‘फेस्टीव्हल टुरिझम’मध्ये मोठी संधी- पंतप्रधान

नवी दिल्ली वृत्तसंस्था । जगभरात सध्या ‘फेस्टीव्हल टुरिझम’ला चांगले दिवस आले असून भारतासारख्या वैविध्यपूर्णतेने संपन्न देशाला यात मोठी संधी असल्याचे प्रतिपादन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात विविध विषयांना स्पर्श केला. त्यांनी अयोध्या प्रश्‍नावर भाष्य करून सरदार पटेल यांच्या योगदानाचा उल्लेख केला. मात्र यात त्यांनी दिवाळीबाबत सविस्तर चर्चा केली. पंतप्रधान म्हणाले की, सध्या जगभरात ‘फेस्टीव्हल टुरिझम’चेही आकर्षण वाढत आहे. आमचा भारत देश हा सणांचा देश आहे. आपल्या देशात फेस्टिव्हल टुरिझमचा विकास करण्यास मोठा वाव आहे. दिवाळी असो, होळी असो, ओणम असो, पोंगल असो किंवा बिहु असो, अशा सर्व सणांचा प्रसार करायला हवा. इतकेच नाही, तर आपल्या या आनंदात इतर राज्ये आणि देशांनाही सहभागी करून घ्यावे असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

मोदी पुढे म्हणाले की, आजकाल केवळ भारतातच नव्हे, तर जगातील अनेक देशांमध्ये दिवाळी साजरी केली जाते. विशेष म्हणजे जगातील देशात दिवाळी महोत्सवात केवळ भारतीयच सहभाग घेत नसून तेथील सरकारे आणि स्थानिक नागरिकही मोठ्या प्रमाणात भाग घेत आहेत. या दिवाळीला काहीतरी वेगळे करणार असे गेल्या वर्षी ‘मन की बात’मध्ये मी संकल्प केला होता. दिवाळीनिमित्त देशातील नारी शक्ती आणि त्यांच्या कामगिरीचा उत्सव साजरा करू या, अर्थात लक्ष्मींचा सन्मान करू असा संकल्प मी केला होता, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, या कार्यक्रमात पंतप्रधानांनी अयोध्या प्रकरणी देशवासियांनी पाळलेल्या संयमाचे कौतुकदेखील केले.

Exit mobile version