Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हॉकीतही ‘चक दे इंडिया’; ब्रिटनला धुळ चारत उपांत्यफेरीत धडक

टोकियो वृत्तसंस्था | सिंधूने कांस्य पदक जिंकल्यानंतर भारतीय हॉकी संघानेही ब्रिटनला ३-१ अशी धुळ चारत हॉकीच्या उपांत्य फेरीत धडक देत पदकाची दावेदारी मजबूत केली आहे.

आज भारतीय संघाचा ब्रिटनविरूध्द अतिशय महत्वाचा सामना होता. यात विजय मिळवणारा संघ हा उपांत्य फेरीत जाऊन किमान कांस्य पदकाचा दावेदार बनणार असल्याने दोन्ही संघांमध्ये चुरशीचा सामना होईल असे मानले जात होते. तर, सामन्यात पहिल्यापासूनच भारताने वर्चस्व राखले. दिलीप्रित सिंग आणि गुरजंत सिंह यांनी अतिशय अप्रतीम गोल करून भारताला पूर्वार्धातच २-० अशी बढत मिळवून दिली. यानंतर ब्रिटनने गोल करण्याचे अनेक प्रयत्न करूनही ते यशस्वी ठरले नाहीत. परिणामी भारताने २-० अशी आघाडी घेतली.

उत्तरार्धात ब्रिटनच्या संघाने अतिशय आक्रमक खेळ केला. यात त्यांनी एक गोल करून भारताच्या आघाडीचे अंतर कमी केले. तर शेवटच्या क्षणांमध्ये भारताच्या हादीक सिंग याने शानदार गोल करून भारताला ३-१ अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली.

भारतीय हॉकी संघाने १९२८ ते १९६४ दरम्यान लागोपाठ सुवर्णपदक पटकावले होते. यात फक्त १९६० साली संघ उपविजेता ठरला होता. यानंतर १९८० मध्ये सुवर्णपदक वगळता भारताला चांगली कामगिरी करता आलेली नाही. भारताचा संघ १९८४च्या लॉस एंजल्समध्ये पाचव्या क्रमांकावर होता. यानंतर संघ सातत्याने पाचच्या खालील क्रमांकावर राहिला होता. तर आजच्या विजयामुळे भारताने ही नामुष्की दूर करत किमान कांस्य पदकाची आशा पल्लवीत केली आहे.

Exit mobile version