Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्रात आताच सत्तांतर अशक्य – माजी मंत्री एकनाथराव खडसे (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । महाविकास आघाडी सरकारकडे १७१ आमदारांचे संपुर्ण बहुमत असल्यामुळे हे सरकार कोसळून राज्यात लगेच सत्तांतर होणे अशक्य आहे. असा आत्मविश्वास व्यक्त करीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टिका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा ओबीसी आघाडीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना माजी मंत्री एकनाथराव खडसे पुढे म्हणाले की, कोरोनाचे संकट साधे समजू नका, समाजातल्या प्रत्येकाने शक्य होईल तेवढे सर्वांनी योगदान दिले पाहिजे. हिच आजची गरज आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचच्या ओबीसी आघाडीने आज आयोजित केलेले हे रक्तदान शिबीरही तितकेच महत्वाचे आहे. राजकारण खड्ड्यात जावू द्या, आज सारा समाज त्रस्त आहे. नाहीतर त्या देवेंद्रला आजकाल काय झाले आहे ? हेच मला समजत नाही. तो रात्री कदाचित दचकून उठत असेल कारण, आतापर्यंत अनेकदा महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या तारखा देणे झाले आहे. देवेंद्र ब्राम्हण असल्याने त्यांचे भविष्य खरे ठरेल का ! आणि समजा सरकार कोसळले तरी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा काय संबंध ! कारण आमच्याकडे १७१ आमदार आहेत. जगातील कोणतीही शक्ती या सरकारला धक्का लावू शकत नाही. भाजपामध्येही बरेच आमदार सध्या नाराज आहेत. त्यांना वाटते की नाथाभाऊ गेला तसा आपणही पक्षांतर करावे. या आमदारांनी भाजपा सोडू नये म्हणून त्यांना सांगण्यासाठी ‘थांबा रे ! सरकार येतयं’ असं पटविण्याचा हा प्रकार आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट आली तरी आम्ही आठवडाभरात पुर्ण बहुमताचे १७१ आमदार समोर उभे करू आणि बहुमताच्या बळावर पुन्हा सत्तेचा दावा करू. ज्यांना हे समजत नाही. त्यांना भुलविण्याचा प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुरू आहे. असेही ते म्हणाले.

कोरोनाच्या काळात रूग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा ओबीसी आघाडीच्या वतीने आज आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.  याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील,  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, ओबीसी विभागाचे महानगराध्यक्ष कौसर काकर, अशोक लाडवंजारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते योगेश देसले यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

 

 

Exit mobile version