Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची क्षमता वाढविली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ae9c1ea9 e8b8 460f 966d 851816a0d474

जळगाव (प्रतिनिधी) ममहाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालये मोठ्या संख्येने सुरू होत आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत आहेत. केंद्र सरकारने एक हजार जागा वाढवून दिलेल्या आहेत. येत्या दोन- तीन वर्षात वैद्यकीय शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होतील, त्याचा लाभ राज्यातील जनतेला होईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगावच्या बांधकामाचा ई- भूमीपूजन सोहळा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी पुणे येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते.

 

राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगावच्या बांधकामाचा ई- भूमीपूजन सोहळा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी पुणे येथे पार पडला. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभ क्षेत्र विकास मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या दालनात करण्यात आले. यावेळी महापौर सीमा भोळे, आमदार चंदूलाल पटेल, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. किरण पाटील, डॉ. किशोर हिंगोले, डॉ. योगिता बाविस्कर, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. संगीता गावित, अरविंद देशमुख आदी उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्री. महाजन यांनी सांगितले, राज्य शासनाने जळगाव येथे वैद्यकीय, दंतवैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी व भौतिकोपचार महाविद्यालयांची निर्मिती करुन शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल सुरू करण्यास 2017 मध्ये मान्यता दिली आहे. एकाच छताखाली विविध प्रकारची चिकित्सा पध्दती एकाच संकुलात मिळावीत म्हणून अशा प्रकारचा शासनाचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. या संकुलाच्या उभारणीमुळे आधुनिक तसेच प्राचीन वैद्यकीय चिकित्सा पध्दतीमध्ये आंतरशाखीय संशोधनास चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

 

वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे यांनी सांगितले, या महाविद्यालयात ऑगस्ट 2018 पासून प्रथम वर्षाची तुकडी प्रवेशित झाली आहे. या महाविद्यालयासाठी 136 एकर जागा चिंचोली शिवारात मंजूर झाली आहे. 500 खाटांच्या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 19190.24 लाख रुपये, निवासस्थाने वसतिगृहाच्या बांधकामासाठी 26695.65 लाख रुपयांच्या रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. 2019- 2020 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी क्षमता 100 वरुन 150 करण्यात आली आहे. तसेच सीपीएस, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमालाही मान्यता मिळाली आहे. याशिवाय शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, जळगावकरीता 100 विद्यार्थी प्रवेशास मान्यता प्राप्त झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version