Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ; तिसर्‍या लाटेचे सावट कायम

मुंबई प्रतिनिधी | काही दिवसांपासून देशभरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून यामुळे तिसर्‍या लाटेचे सावट कायम असल्याचे दिसून येत आहे.

सध्या कोरोनाचे रूग्ण कमी आढळत असल्याने राज्य सरकारने बर्‍यापैकी शिथीलता दिली आहे. मात्र अलीकडच्या काही दिवसांमध्ये देशभरातील रूग्णांची संख्या वाढीस लागली आहे. काल ४६ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासांत ५०९ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४६,७५९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३,२६,४९,९४७पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ४,३७,३७० वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी ३,५९,७७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ३,१८,५२,८०२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे.

देशात शुक्रवारी कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. सरकारनं सांगितल्यानुसार, भारतात ९३ लाखांहून अधिक लोकांना लस देण्यात आल्या आहेत. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून एका दिवसांत करण्यात आलेली ही सर्वाधिक संख्या आहे. दरम्यान, देशातील एकून लसीकरणाचा आकडा ६२ कोटींच्या पुढे गेला आहे. एकीकडे लसीकरण होत असले तरी काही दिवसांपासून वाढीस लागलेली रूग्णसंख्या चिंताजनक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.

Exit mobile version