Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या व्याप्तीत वाढ

जळगाव, प्रतिनिधी ।  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवून आता पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांसोबत मर्यादित कालावधीसाठी पांढरे रेशन कार्डधारकांसाठी ही योजना लागू करण्यात आल्याची माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटी  जिल्हा समन्वयक डॉ. गोपाल जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. 

सद्यस्थितीत कोविड साथरोग परिस्थितीमध्ये कोविड-19 च्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळून येत आहेत. म्युकरमायकोसिस या आजारावरील उपचाराकरिता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये सर्जिकल पॅकेजेस ११  व मेडिकल पॅकेजेस ८  मध्ये उपचाराची मुभा शासनाने उपलब्ध करुन दिली आहे.  या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात कोविड-19 या आजाराच्या ४  हजार १९  रुग्णांवर तर २०  हजार २९  नॉनकोविड रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतंर्गत प्रति कुटुंब, प्रति वर्षी दीड लाख रुपयांचे विमा संरक्षण आहे.  म्युकरमायकोसिस या आजारासाठी विमा संरक्षणापेक्षा अधिकचा खर्च आल्यास राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून हमी तत्वावर अधिकचा खर्च भागविण्यात येणार असल्याचेही डॉ. जोशी यांनी म्हटले आहे. म्युकरमायकोसिस या आजारातील उपचारामध्ये Antifungal औषधे हा महत्वाचा भाग आहे. संबधित औषधे कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सदरची औषधे महागडी आहेत. जळगाव जिल्ह्यात ही औषधे (अॅफोटेरीसीन बी) शासनाच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत अंगीकृत रुग्णालयात पात्र लाभार्थीस शासनाकडून मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. म्युकरमायकोसिस या आजारावरील उपचारासाठी लागणारी बहुआयामी विशेष सेवा, या योजनेतंर्गत जळगाव जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव आणि डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपलब्ध आहेत.   या योजनेतंर्गत उपचार घेण्यासाठी रुग्णाचे रेशन कार्ड व आधार कार्ड रुग्णालयात उपस्थित असणाऱ्या आरोग्य मित्राकडे देणे आवश्यक असून या योजने अंतर्गत म्युकरमायकोसिसवर उपचार पूर्णपणे मोफत करण्यात येतो. जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. जोशी यांनी केले आहे. 

 

Exit mobile version