Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शैक्षणिक योजनांची सूक्ष्म अंमलबजावणी केल्यास जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेत वाढ – जिल्हाधिकारी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जिल्ह्यातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व तसेच शिक्षकांनी व्यक्तिशः जबाबदारी घेऊन निपुण भारत तसेच शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी सूक्ष्म नियोजन करून काटेकोर पद्धतीने केल्यास जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेत नक्कीच वाढ होईल. असा‌ विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तर आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य झोपे, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. किरण कुवर आदी उपस्थित होते. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेला बाला उपक्रम तसेच निपुण भारत व नव साक्षरता अभियानाची अंमलबजावणी संदर्भात जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची तसेच प्रगतीचा आढावा उपस्थित केंद्रप्रमुख तसेच गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी जाणून घेतला.

जिल्हाधिकारी श्री.प्रसाद म्हणाले की,  शिक्षण विभागाच्या संपूर्ण यंत्रणेने जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढ तसेच शैक्षणिक निकाल वाढीवर भर देणे गरजेचे आहे. विविध अभियानाबाबत केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी समन्वयाने बैठक घेऊन उद्दिष्ट निश्चित करणे गरजेचे आहे. गुणवत्ता वाढ कार्यक्रम राबविण्यासाठी तीन टप्प्यात विद्यार्थ्यांची विभागणी करणे गरजेचे आहे. नापास होणारा विद्यार्थी कसा पास होईल याची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. रक्त परीक्षा घेऊन उपयोग नाही तर सूक्ष्म नियोजन करून आराखडा तयार करून विद्यार्थ्यांची वर्गवारी करणे व त्यातून गुणवत्ता वाढ साध्य करणे महत्त्वाचे आहे. निश्चित केलेला आराखडा प्रमाणे काम होते आहे किंवा नाही याची पडताळणी देखील करणे गरजेचे आहे .केंद्रप्रमुखांनी 100% शाळांना भेटी दिल्यास व जिल्हास्तरावरून येणाऱ्या विविध मार्गदर्शक योजना दशक उपक्रमांची 100% प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास गुणवत्ता वाढीसाठी मोठी मदत होईल.

कॉपीमुक्त शाळा ही योजना राबविण्यासाठी कॉपीला प्रोत्साहन देणारे घटकांवर गुन्हा दाखल करावा. यासाठी पुणे जिल्हा परिषदेने राबवलेल्या उपक्रमांचा दाखला देखील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिला.  नवभारत साक्षरता अभियानाचा आढावा घेताना जिल्हाधिकारी यांनी नवभारत साक्षरता अभियानाचे प्रशिक्षण केंद्र स्तरावर किती ठिकाणी झाले आहे याची माहिती जाणून घेतली. त्या सोबतच नाव साक्षरता भारत अभियानाचे वर्ग तातडीने जिल्हाभरात सुरू करण्याचे निर्देश देखील यावेळी दिले. नव साक्षरता भारत अभियान अंतर्गत रात्र शाळा सुरू करण्याचे सूक्ष्म नियोजन करून शिक्षकांनी देखील या उपक्रमासाठी योगदान द्यावे. असे आवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

निपुण भारत तसेच बाला उपक्रमांतर्गत शाळांना देण्यात आलेल्या साधनसामुग्रीचा पुरेपूर वापर होतोय किंवा नाही ते बघण्याची जबाबदारी देखील केंद्रप्रमुख तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पार पाडावी असे निर्देश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

महा वाचन चळवळीचा शुभारंभ १६ डिसेंबर रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. सातत्याने शिक्षकांच्या होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून गुणवत्ता वाढीचे साध्य पूर्ण होत आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी आगामी काळात प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांची परीक्षा घेण्याचे नियोजन असल्याचे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. शिक्षण व्यवस्थेचा शिक्षक हा केंद्रबिंदू असून प्रशिक्षण, स्पर्धाया माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढ साध्य करता येऊ शकते त्यासाठी विद्यार्थ्यांशी शाळेत जाऊन संवाद साधने, नियमित शाळांना भेटी देणे यावर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत देखील जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

यावेळी उपस्थित केंद्रप्रमुख तसेच अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी गुणवत्तावाढी बाबत व अनुभव कथन केला. शालेय जीवनात एका विषयात अभ्यासात कच्चा असताना पुढच्या वर्षी परीक्षेत कसे यश साध्य केले. याचा मंत्र देखील मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी यावेळी मांडला.  केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक,गट शिक्षणाधिकारी यांच्यामध्येजबाबदारीची ही कमतरता न भासू देता नियमित सरावाच्या माध्यमातून शाळांमध्ये अतिउत्कृष्ट काम करण्यावर भर द्यावे. असे आवाहन देखील श्री. अंकित यांनी यावेळी केले.

Exit mobile version