Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आयकर धाड: सहा कोटीची रक्कम सापडल्याच्या चर्चेने खळबळ


जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आठ दवाखान्यात मागील सलग तीन दिवसापासून झाडाझडती सुरु आहे. या झाडाझडतीत  एका रुग्णालयात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना ६ कोटीची रोकड सापडल्याची चर्चा आहे. या संदर्भात अधिकृत कुठलीही माहिती समोर आलेली नाहीय. दरम्यान, रोकड सापडल्याच्या या चर्चेमुळे मात्र,शहरात प्रचंड खळबळ उडालेली आहे.

राज्य आयकर विभागाच्या मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथील पथकांनी बुधवारी जळगाव शहरातील आठ रुग्णालये, पॅथॉलाॅजी लॅबसह डायग्नोस्टीक सेंटर्सवर सशस्त्र पोलिस बंदोबस्तात धाडी टाकून झाडाझडती घेत आहेत.  त्यात मू. जे. महाविद्यालय रस्त्यालगतचे डॉ. विकास बोरोले यांचे नेत्रम हॉस्पिटल, भास्कर मार्केटमधील डॉ. सुनील नाहाटा यांचे वर्धमान अॅक्सिडेंट हॉस्पिटल, इंडो-अमेरिकन हॉस्पिटल व गोल्ड सिटी हॉस्पिटल,डॉ. राजेश डाबी यांचे डाबी न्यूरो सेंटर, रिंगरोडवरील डॉ. अमोल महाजन यांचे मधुर हॉस्पिटल, डॉ. राहुल महाजन यांचे चिन्मय हॉस्पिटल व आंेकारेश्वर मंदिराजवळील डॉ. सुधीर शाह, समीर शाह यांचे शाह डायग्नोस्टीक सेंटर्ससह अाठ रुग्णालयांचा समावेश आहे.

आयकार विभागाची तपासणी सलग तिसऱ्या दिवशी देखील सुरु आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत आज ६ करोडची रोकड सापडल्याची चर्चा आज दुपारपासूनच सुरु आहे. परंतु या संदर्भात अधिकृत कुठलीही माहिती समोर आलेली नाहीय. आजही पोलीस बंदोबस्तात आयकर विभागाचे अधिकारी रुग्णालयातच ठाण मांडून आहेत. आता पर्यंत काय कारवाई झाली? काही अनियमितता आढळी का? याबाबत आयकर विभागाकडून कुठलीही माहिती दिली जात नाहीय.कारवाई पूर्ण झाल्यानंतरच आयकर विभाग माहिती देईल, असा अंदाज आहे. परंतु रोकड सापडल्याच्या चर्चेमुळे जळगावच्या वैद्यकिय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडालेली आहे. अनेक डॉक्टर व सामान्य नागरिक याबाबत एकमेकाला विचारून खात्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 

Exit mobile version