Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिंप्राळा परिसरात रेडक्रॉस दवाखान्याचा शुभारंभ

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त पिंप्राळा परिसरात सेवारथ परिवार यांच्या सौजन्याने रेडक्रॉस दवाखान्याचा शुभारंभ रेडक्रॉसचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी उपाध्यक्ष गनी मेमन, चेअरमन विनोद बियाणी, रक्तकेंद्र चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, पाटील धर्मार्थ दवाखाना समिती चेअरमन अनिल शिरसाळे, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी, जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा, नगरसेवक आबा कापसे, धनराज चौधरी, विजय राणा, धनराज चौधरी, देविदास अडकमोल, संजय बाविस्कर, श्रीकांत तायडे, रवींद्र वाघ, तुषार महाले, दीपक सपकाळे आदींची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना सेवारथ परिवाराचे डॉ.रितेश पाटील यांनी सांगितले की, “पिंप्राळा परिसर हा खूप मोठा परिसर असून गरीब गरजू परिवारांचा येथे रहिवास आहे. अशा सर्व नागरिकांना चांगली रुग्णसेवा मिळावी या उद्देश्याने रेडक्रॉस दवाखाना सुरु करण्यात आला आहे. सर्वोत्तम रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न राहील.”

याबाबत सविस्तर बोलताना उपाध्यक्ष गनी मेमन यांनी सांगितले की, “या दवाखान्यामार्फत नेत्ररोग विभाग (डोळे तपासणी व नंबर काढणे), दंतरोग विभाग (दातांची तपासणी व उपचार), फिजियोथेरपी विभाग तसेच बाह्यरुग्ण विभाग असे विभाग असून अत्यल्प दरात या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.परमानंद पाटील, डॉ.अदिती पाटील हे सेवा देणार आहेत. तसेच सवलतीच्या दरात मेडिकलच्या माध्यमातून औषधी सेवा हि देण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना खूप सोयीचे होणार आहे.”

रेडक्रॉस अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शुभेच्छा देताना म्हणाले की, “रेडक्रॉस जळगाव जिल्ह्यात गेल्या ६९ वर्षांपासून सेवा देत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील रेडक्रॉस शाखांमध्ये जळगाव रेडक्रॉस हि शाखा सर्वात्तम सेवा देत आहे. या सेवाभावना जोपासत असलेल्या संस्थेचा अध्यक्ष असल्याचा मला अभिमान आहे. या रेडक्रॉस दवाखान्याच्या माध्यमातून सुरळीत रुग्णसेवा होत राहील.” जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा. असे आवाहन त्यांनी केले.

सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत रेडक्रॉस अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते रिबीन कापून या रेडक्रॉस दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले. या दवाखान्याच्या उभारणीसाठी योगदान दिलेल्या वैद्यकीय अधिकारी, सेवारथ परिवाराचे सदस्य व सहकारी यांचे आभार रेडक्रॉसचे चेअरमन विनोद बियाणी यांनी मानले.

Exit mobile version