Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

“जोविनि” च्या राज्यस्तरीय अभियानाचे जळगावात उद्घाटन

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । आपल्या जोडीदाराची निवड डोळसपणे व पूर्ण विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम स्वत:ला ओळखता यायला हवे.  आपल्या स्वभावाप्रमाणे जोडीदार निवडताना अवास्तव अपेक्षा वा भ्रामक समजूती टाळायला हव्यात. अनेक पालकांचा असा गैरसमज असतो की एकदा लग्न झालं की पुढच्या गोष्टी आपोआप चांगल्या होतील. पण त्यामुळे लग्न झालेल्या व्यक्तींना आयुष्यभर त्रास सहन करावा लागू शकतो, असे प्रतिपादन राज्य महिला सहभाग विभागाच्या कार्यवाह आरती नाईक यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जोडीदाराची विवेकी निवड विभागाच्या वतीने दि. १२ जानेवारी (राष्ट्रीय युवा दिन) ते १४ फेब्रुवारी (जागतिक प्रेम दिन) दरम्यान राज्यव्यापी युवा संकल्प अभियान राबविण्यात येते. या अभियानाचे उद्घाटन जळगावमधील लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात युवती सभेच्या अंतर्गत करण्यात आले.

मंचावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, शिरीष चौधरी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. पी. आर. चौधरी, पनवेल येथील महिला विभागाच्या राज्य कार्यवाह आरती नाईक, वैज्ञानिक जाणीव प्रकल्प विभागाचे राज्य कार्यवाह प्रा. डी. एस. कट्यारे, महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. जुगल घुगे उपस्थित होते.

प्रस्तावनेमधून कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.  कल्पना भारंबे यांनी दिली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते फीत कापून ‘विवेकी कुंडली’चे उद्घाटन करण्यात आले. माधव बावगे यांनी सांगितले की, तरुण मुलामुलींना विवाह करण्याबाबत प्रचंड गोंधळ असतो.  विवाह करण्याआधी काही योग्य बाबींचा विचार विनिमय वधू-वरांनी वेळेवर लग्नाआधी करायचा असतो. त्यानंतर वैवाहिक आयुष्य सुंदर जगता येते, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षस्थानावरून प्राचार्य राकेश चौधरी यांनी, आयुष्य विवेकी आणि सदविचाराने जगता येते. त्यासाठी सकस वाचन,  महापुरुषांचा आदर्श ठेवणे महत्त्वाचे आहे.  युवा पिढी अनेक विषयांमुळे भरकटत  चालली आहे. मात्र योग्य दिशा मिळाली तर निश्चितच तरुणांच्या आयुष्याचे सोने होईल,  असे प्रतिपादित केले. सूत्रसंचालन प्रा. नितीन बडगुजर यांनी केले तर आभार डॉ. जुगल घुगे यांनी मानले.

यावेळी महाराष्ट्र अनिसचे जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे व विश्वजीत चौधरी, जोडीदाराची विवेकी निवड विभागाच्या जिल्हा कार्यवाह मीनाक्षी चौधरी, शहर शाखा कार्याध्यक्षा कल्पना चौधरी, शिरीष चौधरी, जितेंद्र धनगर आदी उपस्थित होते.  कार्यक्रमासाठी डॉ. भारती गायकवाड़, डॉ. सुनीता चौधरी, प्रवीण जोशी, योगेश महाजन आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version