Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क रहावे -पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | -शासन शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ही भावना सर्वसामान्यांमध्ये रूजविण्यासाठी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवत सर्तक रहावे. अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिल्या.

 

जळगाव जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टी नुकसानीचा व कृषी विभागाच्या कामकाजाचा आढावा‌ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नियोजन सभागृहात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार व विविध शासकीय विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

 

जळगाव जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रावेर, भुसावळ, जामनेर , मुक्ताईनगर तसेच इतर तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवैध, बोगस खतांमुळे ही शेती पिकांचे नुकसान झाले आहे. कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाचा पालकमंत्र्यांसोबत ग्रामविकास मंत्री व मदत, पुनर्वसन मंत्र्यांनी व्यापक आढावा घेतला. आणि प्रशासनाला सूचना केल्या .

 

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले,  कपाशीवरील लाल्या रोगाच्या प्रादुर्भावापासून  संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी जनजागृती करावी. टोल फ्री क्रमांक जाहीर करावा. नॅनो युरियाची फवारणी केली पाहिजे यावर शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी. अवैध खत विक्रेते व कंपन्यांवर कारवाई करावी‌. सततचा पाच दिवस पडणारा पाऊस अतिवृष्टी म्हणून ग्राह्य धरावा.

 

एक रूपयात पीक विमा योजनेचे अर्ज  भरून घेण्यासाठी जिल्ह्यात गावनिहाय मोहीम राबविण्यात यावी. दररोज किमान ४० हजार शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्याचे काम कृषी विभागाने करावे. शेतकऱ्यांकडून अवास्तव पैसे आकारणाऱ्या सेतू सेवा केंद्रांवर कारवाई करा. अशा सक्त सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

 

जिल्ह्यात जरी मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असला तरी धरणातील पाणी पातळी कमी आहे. तेव्हा पाण्याचे काटकसरीने वापर करण्याच्यादृष्टीने नियोजन करावे. जिल्ह्यात राजरोसपणे अवैध दारू विक्री सुरू आहे‌. याला प्रतिबंध घालण्याचे काम उत्पादन शुल्क विभागाने करावे. जळगाव शहरातील अंतर्गत रस्ते व गटारींचे कामे करण्यात यावेत.‌ अशा सूचना ही पालकमंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिल्या.

 

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, अतिवृष्टीमुळे जसे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे तसाच प्रकारे बोगस खते व बियाणे यामुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. याला आळा घालण्यासाठी शासन लवकरच कायदा करणार आहे‌. पोलीस विभागाने ही अशा उत्पादकांवर कडक कारवाई करावी‌.  खतांची गुणवत्ता विभागाने तपासणी करावी.  केळी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी लवकरच केळी विकास महामंडळाच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील. गळके छत असलेल्या शाळांची दुरूस्ती करण्यात यावी. महावितरण विभागाने यंत्रणा सक्षम ठेवत अखंडीत वीज पूरवठा करण्याचे काम करावे‌. ग्रामविकास यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. अशा सूचनाही ग्रामविकास मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी दिल्या.

 

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले , जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रस्ताव तयार करावेत. या प्रस्तावांना मान्यता व निधी पुरविण्याचे काम केले जाईल‌ .

 

यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, आमदार मंगेश चव्हाण व आमदार चंद्रकांत पाटील यांनी ही उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

Exit mobile version