Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चौघांचे बळी प्रकरणात : दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील रामदेववाडी येथील चौघांच्या बळी प्रकरणातील संशयित आरोपी अर्णव कौल आणि अखिलेश पवार यांना आज न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथील रहिवासी असलेल्या चौघांना भरधाव कारने उडविल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी संतप्त होऊन रास्ता रोको आंदोलन देखील केले होते तब्बल १७ दिवस उलटून गेल्यावर देखील या तरूणांवर कारवाई न झाल्यामुळे चर्चेला उधाण आले होते.

दरम्यान, या दुर्घटनेत कारमधील अर्णव अभिषेक कौल आणि अखिलेश संजय पवार या दोघांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबई येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना काल जळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

आज दुपारी या दोघांना जळगाव न्यायालयात सादर करण्यात आले. याप्रसंगी दोन्ही संशयितांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ज्ञ प्रकाश पाटील, अकिल ईस्माईल आणि सागर चित्रे यांनी बाजू मांडली. त्यांनी आपल्या युक्तीवादात अर्णव कौल आणि अखिलेश पवार यांच्या सोबत कारमध्ये अजून दोन जण असल्याकडे लक्ष वेधतांनाच या दोघांनी कार चालविल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे सांगितले. यामुळे या प्रकरणात कलम-३०४ न लावता कलम-२७९ लावावे असा युक्तीवाद देखील केला.

दरम्यान, सरकारी वकील स्वाती निकम यांनी हा युक्तीवाद खोडून काढतांनाच या प्रकरणातील गांभिर्य हे न्यायाधिशांच्या लक्षात आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधिशांनी अर्णव कौल आणि अखिलेश पवार या दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता या दोघांना दिनांक २७ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Exit mobile version