Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मराठवाड्यात साडेतीन हजार जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले

छत्रपती संभाजीनगर-वृत्तसेवा |  मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले. त्यानंतर सरकारतर्फे वंशावळी शोधून मराठा-कुणबी, कुणबी मराठा नोंद सापडलेल्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे. गेल्या दीड महिन्यात मराठवाड्यात ३ हजार ४६२ जणांना कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात महसूल प्रशासनाने २ कोटी पुराव्यांचा शोध घेतला. त्यात २७ हजार मराठा-कुणबा, कुणबी मराठा या पुराव्यांच्या आधारे जवळपाच पाच ते साडे पाच लाख जणांना हे प्रमाणपत्र मिळू शकते, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.एका पुराव्याच्या आधारे सुमारे २० जणांना वंशावळप्रमाणे प्रमाणपत्र मिळू शकेल. रेकॉर्ड शोधण्याचे काम सुरूच आहे. मराठवाड्यात सध्या ३ हजार ४६२ कुणबी जातींची प्रमाणपत्रे वाटप केली.

२ कोटी अभिलेख तपासणीत कुणबी जातीच्या २७ हजार नोंदी आढळल्या असून त्यासाठी खासरापत्र, पाहणीपत्र, क-पत्रक, कूळ नोंदवही, १९५१ चे राष्ट्रीय रजिस्टर, हक्क नोंद पत्र, फेरफार पत्र, ७/१२, गाव नमुना,

प्रवेश निर्गम नोंदवही, अनुज्ञप्ती नोंदवही, मळी नोंदवही, ताडी नोंदवही, आस्थापना नोंद, कारागृहातील नोंदी, गाववारी, गोपनीय रजिस्टर, क्राइम रजिस्टर, अटक पंचनामे, एफआयआर, मुद्रांक विभागातील १३ प्रकारचे दस्तऐवज, भूमी अभिलेखमधील ७ दस्तऐवज तपासले आहेत.जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर- ३३७ प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तर जालना- ५३६, बीड-१९०४,धाराशिव-५१२,हिंगोली-४६, परभणी-३७, लातूर-४०, नांदेड-५० अशा एकूण ३ हजार ४६२ प्रमाणपत्रांचा समावेश आहे.

Exit mobile version