Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इम्रान यांचे ‘ते’ वक्तव्य म्हणजे आंतरराष्ट्रीय दिखावा

imran khan modi

नवीदिल्ली  (वृत्तसंस्था) भारतात लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू असून मोदी पुन्हा सत्तेत येणार का? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. यातच मोदी परत पंतप्रधान झाले तर काश्मीर प्रश्नी तोडगा निघेल, अशी भावना पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याने व्यक्त केली आहे. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात असले तरी मोदींना पाठिंबा देण्यामागे इम्रान खान यांची मोठी आंतरराष्ट्रीय खेळी असल्याचे निदर्शनास येत आहे.

 

सध्या पाकिस्तान फक्त राजकीय दृष्ट्याच कमकुवत झालेला नाही तर दुसरीकडे पाकिस्तानची अर्थव्यवस्थाही डबघाईला आली आहे. पाकिस्तान प्रचंड कर्जबाजारी झाला असून देशातील कोट्यवधी जनतेला दोन वेळी पुरेसं जेवण देखील मिळण्याची भ्रांत आहे. अमेरिकेने आर्थिक मदत बंद केल्यामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं आहे. त्यात भारतानेही आर्थिक संबंध तोडल्यामुळे भाज्यांच्या आणि तेलांच्या किमतींनी आसमान गाठलं आहे. चीन आणि इतर इस्लामिक देश पाकला मदत करत असले तरी तेवढी मदत पाकिस्तानला पुरेशी नाही.

अशा परिस्थितीत आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा बदलण्याशिवाय पाकिस्तानकडे कोणताच मार्ग उरलेला नाही. यामुळे एकीकडे भारत पाकिस्तानचा सगळीकडे आक्रमक विरोध करत आहे तरी पाकिस्तान मात्र सांमजस्याची, शांततेची आणि चर्चेची भाषा करतं आहे. मोदींना पाठिंबा देऊन हीच शांतताप्रिय देशाची प्रतिमा उजळ करण्याचा इम्रान खान यांचा डाव आहे.

मोदींना एकहाती सत्ता मिळाली तर भारताला एक खंबीर आणि निर्णायक नेतृत्व मिळेल. काश्मीर प्रश्नाचा तिढा सोडवण्याची ताकद त्यांच्यामध्ये असेल जी काँग्रेसच्या कोणत्याच नेत्यामध्ये नाही . त्यामुळे चर्चेने या प्रश्नाचा तिढा सुटेल, असं म्हणत पाकिस्तान एका निर्णायक चर्चेसाठी तयार असल्याचं इम्रान खान भासवत आहे. यातूनच भारतीय उपखंडातील एक सकारात्मक ,शांतताप्रिय देश आहोत असं इम्रान खान यांना दाखवायचं आहे. या कारणामुळेच मोदी पुन्हा निवडून येण्याबाबत त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पण मोदी सत्तेवर आल्यावरही इम्रान खान हीच भूमिका कायम ठेवतील का? याबद्दल मात्र संभ्रम व्यक्त केला जातो आहे.

Exit mobile version