महत्वाची बातमी : राज्यातील विधवा प्रथा होणार बंद ! ‘जीआर’ जारी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्याच्या ठरावाला आता राज्यात लागू करण्यात आले असून याबाबतचा शासननिर्णय अर्थात ‘जीआर’ जारी करण्यात आला आहे.

आज एकविसाव्या शतकातही विधवांसाठीच्या काही प्रथा पाळण्यात येतात. यात पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगडया फोडणे, पायातली जोडवी काढली जाणे, यासारख्या प्रथांचे पालन केले जाते. या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार हेरवाड ग्रामस्थांनी केला. यानुसार येथील ग्रामसभेने विधवा प्रथा बंद करण्याचा धाडसी आणि पुरोगामी निर्णय अलीकडेच घेतला आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
हेरवाड ग्राम पंचायतीचे सरपंच पाटील आणि ग्रामविकास अधिकारी कोळेकर यांनी याबाबत विशेष परिश्रम घेतले. विधवा महिलांना इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. विधवा प्रथांचे पालन होत असल्याने प्रतिष्ठीचे जीवन जगण्याच्या मानवी तसेच संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होते. त्यामुळे भविष्यात स्त्रियांच्या अधिकाराचे हनन होऊ नये, यासाठी हा निर्णय अतिशय महत्वाचा असल्याचे कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे.

दरम्यान, हेरवाड ग्रामपंचायतीच्या या निर्णयाला राज्यभरात लागू करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व ग्राम पंचायतीनी हेरवाडचे अनुकरण करून आदर्श ठेवण्याचे आवाहन केले आहे.

यानंतर राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय म्हणजेच जीआर जारी केला आहे. या अनुषंगाने हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्याच्या ठरावाची शासनाने दखल घेतली असून राज्यातील सर्व ग्रामपंचायतीनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे असा शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. हा शासन निर्णय १७ मे २०२२ रोजी जारी करण्यात आला आहे.

या शासन निर्णयानुसार विधवा प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक गावाने स्वतंत्र ग्रामसभा घेऊन याबाबत ठराव करावेत. तसेच जिल्हा परिषदेच्या अंतर्गत यासाठीची जनजागृती करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात या माध्यमातून एक नवीन पुरोगामी पाऊल टाकण्यात येत असल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे.

Protected Content