Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सर्व पत्रकारांचे तातडीने लसीकरण करा : ना. गुलाबराव पाटील

मुंबई, प्रतिनिधी : कोविडच्या प्रतिकारामध्ये मोलाची भूमिका पार पाडणार्‍या राज्यातील प्रिंट  व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे अशी मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे  पत्राच्या माध्यमातून केली आहे.

 

याबाबत वृत्त असे की, एका वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून महाराष्ट्र राज्यातील आरोग्य कर्मचारी, पोलिस, सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. या अत्यावश्यक सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांप्रमाणेच विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर व प्रतिनिधी हे देखील बातम्यांच्या शोधात संपूर्ण राज्यभर फिरत असतात. प्रत्येक जिल्हा,तालुका व गावाची कोविड १९ च्या संसर्गाबाबतची सद्यस्थिती विविध माध्यमाद्वारे शासनास अवगत करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ज्याप्रमाणे देशातील इतर काही राज्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे  त्याप्रमाणे आपणही आपल्या राज्यात पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देवून त्यांना तातडीने कोविड प्रतिबंधक लस देण्यात यावी अशी विनंती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जळगाव येथे नुकतेच पत्रकारांचे लसीकरण करण्यात आले आहे. याच प्रमाणे राज्यभरात पत्रकारांना लस देण्यात यावी अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे.

Exit mobile version