Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : पालकमंत्री

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्ह्यातील रावेर, यावल व चोपडा तालुक्यातील अवकाळी पावसासह वादळी वार्‍याच्या फटक्यामुळे सुमारे ७६६.५० हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले असून याचे तातडीने पंचनामे  सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. या संदर्भात शेतकर्‍यांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाहीदेखील पालकमंत्र्यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील रावेर, यावल व चोपडा तालुक्यात मंगळवार, दि.३१ मे रोजी सायंकाळी अवकाळी पाऊस आणि वादळाचा मोठा फटका बसला. यामुळे केळीसह अन्य पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. यात चोपडा तालुक्यातील ७ गावांमधील ७५ शेतकर्‍यांच्या ४८.७० हेक्टर जमीनीवरील पिकांची  हानी झाली आहे. याचप्रमाणे यावल तालुक्यातील ३३ गावांमधील ३०४ शेतकर्‍यांच्या २४७.०० हेक्टर क्षेत्रफळावरील पिकांचे नुकसान झालेले आहे. रावेर तालुक्याला याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. या तालुक्यातील १५ गावांमधील ५७६ शेतकर्‍यांच्या ४७०.८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे.

या अवकाळी पाऊस व वादीळी वार्‍यांमुळे चोपडा, यावल व रावेर तालुक्यातील केळी पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. दरम्यान, या नुकसानीची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. या नुकसानीचे महसूल व कृषी खात्यातील यंत्रणेने तातडीने पंचनामे करावे, यासाठी तात्काळ ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना निर्देश द्यावेत असे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सुचना दिल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. संभाजी ठाकूर यांनी दिली आहे.

Exit mobile version