Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव बाजार समितीतील दुकाने बेकायदेशीररित्या दिली भाड्याने?

jalgaon

 

जळगाव (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दुकान क्रमांक 1 ते 24 गाळेधारकांपैकी अनेकांनी बाजार समितीचे नियम मोडून बेकायदेशीररित्या भाड्याने दिली असल्याचे बोलले जात आहे. इतकंच काय तर स्वतःचा माल ते बाजार समितीच्या जागेत ठेवून व्यवहार करतात. असा दोन्ही बाजूने उत्पन्न कमवायचे आणि वरून बाजार समितीच्याच विकासाला विरोध करायचा चंग काही व्यापार्‍यांनी बांधल्याचा आरोप होत आहे.

 

कृषी उत्पन्न बाजार समितीने आवारात अनेक गाळे बांधले आहे. परंतु मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गाळा क्रमांक 1 ते 24 आहेत. यामध्ये काही दिग्गजांचे गाळे आहेत. बाजार समितीने हे गाळे भाड्याने देताना अन्य कुणीही इसमाला गाळा भाड्याने देवू नये किंवा पोट भाडेकरू ठेवू नये अशी अट घातली होती. मात्र, बहुतांशी गाळेधारकांनी आपले गाळे बेकायदेशीररित्या भाड्याने दिले आहे. काहींनी पोट भाडेकरू ठेवले आहेत तर काहींनी ते लपविण्यासाठी भाडेकरूंसोबतच भागीदारी व्यवसाय करारनामा करून घेतला आहे. त्यामुळे स्वतःचे काय ते गैरप्रकार सहज झाकले जातात.

 

शेतीउपज व्यतिरिक्त मालाची विक्री

बाजार समितीमध्ये शेतीउपज मालाची विक्री करण्यास परवानगी आहे. परंतु काही व्यापारी मात्र शेतीउपज नसलेला माल देखील त्याठिकाणी विक्री करतात. बाजार समिती व्यवस्थापनाकडून अनेक वेळा याकडे दुर्लक्ष देखील करण्यात येते.

 

स्वतःचा माल उघड्यावर

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील संरक्षक भिंत तोडल्यानंतर व्यापार्‍यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदचे मूळ कारण काही वेगळंच आहे. दुकान क्रमांक 1 ते 24 पैकी ज्यांनी स्वतःचा गाळा भाड्याने दिला आहे ते त्यांचा माल दुकानाच्या बाहेर ठेवतात. बाजार समितीच्या मालकीच्या जागेवर माल ठेवून बाहेरच्या बाहेर परस्पर व्यवहार करतात. त्यामुळे बाजार समितीला कोणताही अतिरिक्त कर देखील मिळत नाही. तसेच स्वतःचे दुकान भाड्याने दिलेले असल्याने खरी भाडे वसूली होत नाही. एकप्रकारे ही बाजार समितीची आणि शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांची फसवणूकच आहे. यासह व्यापाऱ्यांचे अनेक गैरव्यवहार समोर येत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

Exit mobile version