Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘जर मर्द असाल तर मर्दासारखं अंगावर या; मग बघून घेतो’ : मुख्यमंत्री

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | “केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन एकमेकांच्या कुंटुंबियांच्या त्रास दिला जातोय. तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करुन, संस्थाचा दुरुपयोग करुन या गोष्टी केल्या जातायंत. शिखंडीच्या मागे राहून धाडी टाकायच्या याला मर्दपणा म्हणत नाहीत. जर मर्द असाल तर मर्दासारखं अंगावर या, मग बघून घेतो. ” असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिलं आहे.

ईडीने दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली होती. त्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिल्याची चर्चा आहे. या प्रकरणावर व्यक्त होतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीका करत त्यांना आव्हान केले.

ते म्हणाले की, “केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन एकमेकांच्या कुंटुंबियांच्या त्रास देण्याची एक अत्यंत विकृत पद्धत आता सुरु आहे. ही अत्यंत निच आणि निंदनीय पद्धत, विकृत अशी गोष्ट सुरू असून जर मर्द असाल तर मर्दासारखं अंगावर या, मग बघून घेतो. तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करुन, संस्थाचा दुरुपयोग करुन या गोष्टी केल्या जातायेत. शिखंडीच्या मागे राहून धाडी टाकायच्या याला मर्दपणा म्हणत नाहीत. आम्ही जर तुमच्यासोबत असतो तर तुम्ही आमच्या कुटुंबियांना बदनाम केलं असतं का?” असा प्रश्नही त्यांनी केला. यासह “पहाटेचा प्रयोग’ यशस्वी झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते.” असा उपरोधिक भाषेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला.

Exit mobile version