Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दूध संघात अपहार झाला आहे, तर गुन्हा दाखल झालाच पाहिजे – आ. राजूमामा भोळे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दूध संघात अपहार झाला आहे तर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, परंतू पोलीस प्रशासनाने सगळ्या प्रकरणाचा चौकशी करून संबंधितांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी आमदार राजूमामा भोळे यांनी केला आहे. जळगाव जिल्हा दूध संघात झालेल्या अपहाराबाबत दोन दिवसांपूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांनी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला नाही म्हणून भाजपाचे आमदार व पदाधिकारी यांनी गुरूवार १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सात वाजता शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांची भेट घेतली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा दूध संघाच्या प्रॉडक्ट विभागाच्या रेकॉर्डला १४ टन बटर अर्थात लोणी इतरत्र पाठविल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र लोणी ठेवण्याच्या नावाखाली मोठा अपहार झाला आहे. त्याचप्रमाणे ८ ते ९ मॅट्रिक टन दुधाची भुकटीतही मोठ्या प्रमाणावर अपहार झालेला आहे. दोघा मालांची परस्पर विक्री करण्यात आली आहे. यात कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, याची चौकशी अहवाल सादर करून तात्काळ शहर पोलीस ठाण्यात प्राथमिक अहवाल नोंदवून घ्यावा, अशी मागणी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ११ ऑक्टोबर रेाजी केली होती. परंतू दोन दिवस होवून देखील याबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. यासाठी गुरूवार १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता भाजपाचे आमदार राजूमामा भोळे यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांना गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पोलीस अधिकारी हे गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याच आरोप आमदार राजूमामा भोळे यांनी केला आहे. येत्या दोन दिवसात अपहाराचा गुन्हा दाखल न झाल्यास भाजपातर्फे जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार भोळे यांनी दिला. याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, महिला आघाडीच्या उज्जला बेंडाळे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Exit mobile version