Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

झेपत नसेल तर अजित पवारांनी पुण्याचं पालकमंत्रीपद सोडाव – चंद्रकांत पाटील

पुणे  वृत्तसंस्था । अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी हे पद सोडावं, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. कोरोनाच्या संकटकाळात अजित पवार उपलब्ध नाहीत. ते सध्या आहेत तरी कुठे, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

यावेळी चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारच्या संभाव्य लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध केला. कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात असताना पालकमंत्री जिल्ह्याला वेळ देत नाहीत. फोनवरही ते नागरिकांना उपलब्ध होत नाहीत. अजित पवार यांनी आता त्यांची झोप कमी करून पुण्यात लक्ष द्यायला हवं. पुणे जिल्ह्यात लक्ष घालायला त्यांना वेळ नसेल तर पुण्याचा पालकमंत्री बदला, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यामुळे आता अजित पवार या टीकेला काय प्रत्युत्तर देतात, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

काही दिवसांपासून पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक लढाया रंगताना दिसत आहेत. अजित पवार यांनी पंढरपूरच्या सभेत ‘चंपा’ या संबोधनावरून चंद्रकांत पाटील यांना डिवचले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना निर्वाणीचा इशारा दिला होता.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने राज्यातील लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर केले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आज कडकडीत लॉकडाऊनची घोषणा करतील, अशी चर्चा आहे.

Exit mobile version